रिअल इस्टेट सुसाट; विक्रमी दस्त नोंदणीसह २० कोटींचा महसूल शासनाच्या तिजोरीत

सचिन जोशी | Monday, 4 January 2021

चार महिन्यांत शासनाला जळगाव जिल्ह्यातून तब्बल ६४ कोटींचा महसूल प्राप्त झाला असून, वर्षभराचा विचार करता ११० कोटी मिळाले आहेत.


जळगाव : कोरोना व लॉकडाउनमुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठा फटका बसलेला असताना वर्षाखेरीस मात्र चित्र बदलून या क्षेत्राला दिलासा मिळाला. शासनाने मुद्रांक शुल्कात मोठी सवलत दिल्याच्या परिणामी डिसेंबरमध्ये जिल्ह्यात विक्रमी १३ हजारांपेक्षा अधिक दस्तनोदणी होऊन २० कोटींपेक्षा जास्त महसूल शासनाकडे जमा झाला आहे. राज्याची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. 

सरते वर्ष कोरोना महामारीमुळे गेलेले बळी, लॉकडाउनमुळे अडचणीत आलेली अर्थव्यवस्था आणि विविध क्षेत्रांतील उद्‌ध्वस्ततेने गाजले. मार्च ते जूनपर्यंत कडक लॉकडाउन होते. त्यानंतर अनलॉकच्या टप्प्याटप्प्यातील प्रक्रियेनंतर विविध क्षेत्र व पर्यायाने अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागली. लॉकडाउनचा फटका जसा उद्योग व विविध व्यापार-व्यवसाय क्षेत्राला बसला तसा तो सर्वाधिक प्रमाणात रिअल इस्टेटलाही बसला. 

शासनाचे प्रयत्न यशस्वी 
नोटबंदी, जीएसटीनंतर कोरोना लॉकडाउनमुळे रिअल इस्टेट क्षेत्रास सलग चौथ्या वर्षी अडचणींना तोंड द्यावे लागले. परंतु त्यातून दिलासा मिळण्यासाठी शासनाने मुद्रांक शुल्क पाच टक्क्यांवरून दोन टक्के केले आणि सप्टेंबरपासून या क्षेत्रातील उलाढाली वाढू लागल्या. डिसेंबरपर्यंत दोन टक्के मुद्रांक शुल्क लागू होते, त्यामुळे डिसेंबरमध्ये राज्यासह जळगाव जिल्ह्यातही फ्लॅट, घरांचे व्यवहार वाढले आणि शासनाला मोठा महसूल मिळण्यास मदत झाली. 

Advertising
Advertising

जिल्ह्याची स्थिती 
या पूर्ण वर्षाचा (२०२०) विचार करताना जिल्ह्यात डिसेंबरमध्ये महिन्यांत सर्वाधिक १३ हजार ७८४ एवढी दस्तनोंदणी झाली. त्यातून शासनाला जवळपास २० कोटींपेक्षा अधिक महसूल प्राप्त झाला. तो गत वर्षातील (२०१९) डिसेंबरच्या तुलनेत ४० टक्के अधिक आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबरातील दस्तनोंदणीपेक्षा नोव्हेंबरची नोंदणी ४० टक्के अधिक, तर डिसेंबरची तब्बल ८० टक्के जास्त आहे. या चार महिन्यांत शासनाला जळगाव जिल्ह्यातून तब्बल ६४ कोटींचा महसूल प्राप्त झाला असून, वर्षभराचा विचार करता ११० कोटी मिळाले आहेत. राज्यात तर गत वर्षाच्या (२०१९) तुलनेत सरत्या वर्षातील डिसेंबरमध्ये दस्तनोंदणीत ९२ टक्के व महसुलात ६० टक्के वाढ झाली आहे. 

वर्षाअखेर झाली गोड 
महिना ---- दस्तनोंदणी ---महसूल (कोटी) 
सप्टेंबर ---- ६,९४७ ------ १३.२४ 
ऑक्टोबर --- ६,८४४ ----- १४.८० 
नोव्हेंबर ---- ८,८०४ ------ १५.२० 
डिसेंबर ---- १३,७८४ ----- २० 

राज्याची स्थिती 
महिना ---- दस्तनोंदणी ---- महसूल (कोटी) 
सप्टेंबर ---- २,४७,६०९ -----१६४२.२ 
ऑक्टोबर ---२,७४,२३५-----१९१०.९ 
नोव्हेंबर ----२,७४,७७३----- १७५४.४४ 
डिसेंबर----४,५९,६०७-----४३१४.२