राज्यात ५० हजार शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत 

corn mraket
corn mraket

भडगाव : केंद्र शासनाने राज्यातील शिल्लक मका खरेदीसाठी वाढीव अडीच लाख क्विंटल खरेदीला मान्यता दिली. मात्र, राज्यात मका खरेदीसाठी नोंदणी केलेल्या एकूण ७३ हजार ३७३ शेतकऱ्यांपैकी १८ जिल्ह्यांतील तब्बल ५० हजार नऊ शेतकरी मका खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्वारीसाठी नोंदणी केलेल्या पाच हजार ६८६ शेतकऱ्यांपैकी तीन हजार ६३ शेतकरी अजूनही ज्वारी मोजणीकडे आस लावून बसले आहेत. मात्र, केंद्राकडून मंजुरी मिळालेला मका पुढच्या पाच दिवसांतच खरेदी होईल. उर्वरित उत्पादनाचे करायचे काय, असा प्रश्‍न नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. 
यंदा पहिल्यांदा रब्बी हंगामातील मका व ज्वारी खरेदीसाठी शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे खासगी बाजारात कवडीमोल भावात जाणाऱ्या मालाला चांगला भाव मिळण्याची आशा पल्लवित झाल्या. मात्र, राज्यात मक्याचे झालेले उत्पादन व शासनाने खरेदीसाठी दिलेली परवानगीत मोठी तफावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे मका व ज्वारी खरेदीसाठी नोंदणी केलेल्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मका मोजणीअभावी पडून आहे. त्यामुळे नोंदणी केलेला शेतकरी चांगलाच अडचणीत आला असल्याचे चित्र आहे. 

५३ हजार शेतकऱ्यांना खरेदीची प्रतीक्षा 
राज्यातील १८ जिल्ह्यांतील ७३ हजार ३७३ शेतकऱ्यांनी मका खरेदीसाठी नोंदणी केली होती. मात्र, त्यापैकी आतापर्यंत केवळ १७ हजार ३५ शेतकऱ्यांचा सात लाख ३९ हजार ४०८ क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. ५० हजार नऊ शेतकऱ्यांना अजूनही मोजणीची प्रतीक्षा आहे. ज्वारीसाठी पाच हजार ६८६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ चाळीस टक्के म्हणजे दोन हजार ६९३ शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी झाली आहे. अजून तीन हजार ६३ शेतकरी मोजणीकडे आस लावून बसले आहेत. ज्वारीची आतापर्यंत ५८ हजार ९६८ क्विंटल खरेदी झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी प्रतीक्षेत 
राज्यातील १८ जिल्ह्यांतील तब्बल ५० हजार मका उत्पादक शेतकरी मोजणीच्या प्रतीक्षायादीत आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी आहेत. जिल्ह्यातील १७ हजार ६०९ शेतकऱ्यांचा मका शिल्लक आहे. तर त्या खालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. तेथील १५ हजार ९८३ शेतकऱ्यांचा मका मोजायचा राहिला आहे. धुळ्यातील चार हजार ८२, औरंगाबादमधील दोन हजार ८५१, जालना जिल्ह्यातील चार हजार ५०१, नाशिकमध्ये तीन हजार ९०४ शेतकऱ्यांना मका खरेदीची प्रतीक्षा आहे. याशिवाय इतर जिल्ह्यातील शेतकरी ही आमचा मका केव्हा खरेदी होईल, याकडे डोळे लावून बसले आहेत. 

जिल्हानिहाय मका खरेदीच्या प्रतीक्षेत असलेले शेतकरी 
जिल्हा ...... नोंदणी शेतकरी ...... शिल्लक शेतकरी 
नागपूर .......... २५ ................ ० 
नगर ...... १,४२५ .............. ३७३ 
अकोला ......... ७७० ............. १७६ 
अमरावती ........ १५ ............... ० 
औरंगाबाद ....... ७,८२९ ............. २,८५१ 
भंडारा ............. ५८ .............. २ 
बुलढाणा .......... १८,७१८ ........... १५,९८३ 
चंद्रपूर ............. ६७ ................ ३ 
धुळे .............. ५,५०० ............. ४,०८२ 
गडचिरोली ......... ९६९ ................. ९९ 
गोंदिया ............ ११८ ................ २३ 
जळगाव ........... २०,४२६ ............. १७,६०९ 
जालना ............ ६,१९६ .............. ४,५०१ 
नाशिक ............ ७,५७७ ............. ३,९०४ 
पुणे .............. ६९१ ................ ३४ 
सांगली ............ १४३ ................. ० 
सातारा ............. ३४७ ............... ० 
सोलापूर ........... २,७९९ ................ ३७९ 
एकूण ............. ७३,३७३ .............. ५०,००९ 

मका खरेदी दृष्टिक्षेपात 
- एकूण ७३,३७३ शेतकऱ्यांची नोंदणी 
- एसएमएस पाठविलेले शेतकरी ः १९,०८६ 
- मका खरेदी झालेले शेतकरी ः १७,०३५ 
- प्रतीक्षेत असलेले शेतकरी : ५० हजार नऊ 
- एकूण मका खरेदी ः ७,३९,४०८ क्विंटल 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com