कोरोन इफेक्‍ट :  सोने बाजाराला सोळाशे कोटींचा फटका 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 9 June 2020

लग्नसराईसाठी ज्यांची अगोदर दागिन्यांची ऑर्डर दिली होती ते आता दागिने घेत आहेत. ग्राहकांना कोरोना संसर्ग होवूनये यासाठी त्यांना सॅनिटायझर केले जात आहे, हॅंडवाश दिले जाते. हातमोजे दिले जाताहेत. गरम हळदीयुक्त दूधही दिले जाते. ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे 

सुशील बाफना, संचालक 
रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स 

जळगाव :  जिल्हा सोन्याची नगरी म्हणून ओळखला जातो. जळगावचे शुद्ध सोने घेण्यासाठी जळगाव जिल्हाच नव्हेतर, महाराष्ट्रासह परराज्यातूनही ग्राहक येथे येतात. मात्र, "कोरोना'मुळे देशभर लॉकडाउन होते. जळगावच्या सराफ बाजारही बंद आहे. गेल्या अडीच महिन्यापासून सुवर्ण बाजारात सुमारे सोळाशे कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. 

दरम्यान 5 जूनपासून हळूहळू सोने बाजारपेठ पूर्वपदावर येत आहे. ग्राहकांची सोने खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र गर्दीला सोशल डिस्टन्स, मास्क वापरणे, सॅनिटायराझेशनचा वापर सराफ व्यावसायिक करून व्यवसाय करताना दिसत आहे. 

23 मार्चपासून "कोरोना' मुळे सर्वच "लॉकडाउन' झाले होते. केंद्र व राज्य शासनाने अनलॉक करण्याबाबत तीन टप्प्पे दिले होते. त्यातील दुसऱ्या टप्प्यापासून अर्थात 5 जूनपासून सम, विषम दिनांकाना दुकाने सुरू आहे. त्यात सराफ व्यावसायिकही आहेत. 

जानेवारीपासूनचे बुकिंग 
पाच जूनपासून सर्वच सराफ दुकानांवर नवीन सोने चांदीचे दागिने विकणे सुरू झाले आहे. ज्यांच्याकडे मार्चच्या अखेरीस, एप्रिल, मे महिन्यात लग्न होते त्यांनी जानेवारी 2020 मध्येच 41 हजार तोळे प्रमाणे दागिन्यांची ऑर्डर बुक केली होती. मात्र लॉकडाऊनमुळे लग्न समारंभ बंद होते. आता लग्न समारंभांना परवानगी दिल्याने जानेवारीमध्ये दागिन्यांचे आरक्षण केलेले ग्राहक दागिने घेण्यासाठी येत आहे. 

6 हजारांचा फायदा 
ज्यांच्याकडे आगामी काळात विवाह आहे ते दागिन्यांची खरेदी करीत आहेत.सध्या सोन्याचा दर प्रतितोळा 47 हजार आहे. ज्यांनी जानेवारीत दागिन्यांची ऑर्डर दिली होती त्याचा तब्बल सहा हजारांनी फायदा झाला आहे. 

लॉकडाऊनमुुळे सोने- चांदीच्या दुकानांवर उपजीविका करणाऱ्या लहान दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली होती. आता मात्र बाजारपूर्वपदावर येत असल्याने त्यांच्या रोजगाराची सोय झाली आहे. 

जळगाव जिल्ह्यातील सोने शुद्ध असल्याने जळगावच्या सोन्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. बाराही महिने सोन्याच्या बाजारपेठेत गर्दी दिसते. मात्र, गेल्या अडीच महिन्यांपासून "कोरोना व्हायरस'मुळे झालेल्या "शटडाउन', संचारबंदीमुळे याचा मोठा आर्थिक फटका जळगाव जिल्ह्यातील बाजारपेठेला बसला आहे. 

नऊशेवर सराफी दुकाने 
जळगाव शहराचा विचार केल्यास 175 दुकाने आहेत. जिल्ह्यात 900 सराफाची दुकाने आहेत. या दुकानात 8 हजार मजूर सोने-चांदीचे दागिने घडविणारे कारागीर आहे. या सराफ पेढ्यांवर काम करणारे 4 हजार कर्मचारी आहेत. शहरात दररोज सुमारे 15 कोटींची उलाढाल होते. जिल्ह्यात दररोज सुमारे 25 ते 30 कोटींची उलाढाल होते. ती सर्व ठप्प झाली होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Coron Effect: Gold market los by Rs 16 crore