esakal | जळगाव जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना होणार हद्दपार ?
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना होणार हद्दपार ?

जिल्ह्यात शासकीय कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर सुरू झाली. त्याबरोबरच खासगी कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड केअर सेंटरही सुरू झाली. यामुळे बाधित रुग्णांचा ताण एकट्या शासकीय यंत्रणेवर न येता इतर ठिकाणी विभागला गेला. 

जळगाव जिल्ह्यात दिवाळीनंतर कोरोना होणार हद्दपार ?

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः कोरोनाचा संसर्ग वाढत असताना शहरासह जिल्ह्यात शासकीय व खासगी कोविड हॉस्पिटल, केअर सेंटर सुरू झाले होते. आता कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने कोविड हॉस्पिटल व केअर सेंटर बंद होत आहेत. दिवाळीनंतर कोरोनाबाधितांची आतासारखी संख्या कमी राहिल्यास कोरोना हद्दपार झाला असे म्हणता येईल, असा दावा आरोग्य यंत्रेणेने केला आहे. 

आवर्जून वाचा- खडसेंपुढे पक्षाची मोट, जिल्ह्याच्या पालकत्त्वाचे दुहेरी आव्हान !

दरम्यान, सध्या तीन खासगी कोविड हॉस्पिटल बंद झाली आहेत. शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने तेही बंद करून जिल्ह्यात केवळ तीनच शासकीय कोविड केअर सेंटर सुरू ठेण्यात येणार आहेत. 
मार्चअखेरपासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाची लागण सुरू झाली. नंतरच्या कालावधीत बाधितांची संख्या राज्यात सर्वाधिक जळगावला होती. असे असले तरी जिल्ह्यात शासकीय कोविड रुग्णालये, कोविड केअर सेंटर सुरू झाली. त्याबरोबरच खासगी कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड केअर सेंटरही सुरू झाली. यामुळे बाधित रुग्णांचा ताण एकट्या शासकीय यंत्रणेवर न येता इतर ठिकाणी विभागला गेला. 

महिनाभरापासून संसर्ग नियंत्रित 
गेल्या महिन्याभरापासून कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने कमी होतेय. एक हजार बाधित रुग्ण जिल्ह्यात आहेत. त्यात ७५० रुग्ण होम क्वारंटाइन आहेत, तर साडेतीनशे रुग्णांवरच हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जिल्हा कोविड रुग्णालयात २८ रुग्ण दाखल आहेत. इतर विविध ठिकाणी उपचार घेत आहे. शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये अतिशय कमी संख्येने रुग्ण असल्याने तेथील रुग्ण जवळच्या कोविड केअर सेंटरला हलविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

तालुक्यांमध्ये सेंटर बंद 
पारोळा, अमळनेर, एरंडोल, धरणगावचे रुग्ण चोपडा कोविड केअर सेंटरमध्ये, तर पाचोरा, भडगावचे रुग्ण चाळीसगावला, पहूरचे जामनेरला, तर भुसावळ परिसरातील रुग्ण डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्याचे सांगण्यात आले आहे. तालुक्यावरील सीसीसी सेंटरमधील स्टॉफला त्यांच्या नियमित ठिकाणी रूजू होण्यास सांगण्यात आले आहे. सीसीसी सेंटरमधील सर्व वस्तू, साहित्य योग्य स्थितीत ठेवून त्यावर एका जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्तीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 


आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यातील १३ हजार शेतकऱ्यांनी दिली चुकीची माहिती ! 

...तर दुसरी लाट 
आगामी सण दिवाळी, पाडव्यानिमित्त नागरिकांची बाजारपेठेत गर्दी होत आहेत. सर्वच जण सोशल डिस्टन्स, मास्क लावणे या बाबींचे पालन करीत नाहीत. दिवाळीत नागरिक एकमेकांच्या घरी जातील. त्या काळात ते एकमेकांच्या संपर्कात येतील. त्या वेळी कोणाला कोरोना संसर्गाची बाधी झाली नाही, तर चांगलेच आहे. संसर्ग होऊन अधिक रुग्ण समोर आले, तर मग कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते. मात्र, दिवाळीनंतर रुग्णसंख्या कमी राहिल्यास कोरोना हद्दपार होईल, असे सांगण्यात येत आहे. 


दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सीसीसी सेंटरमधील रुग्ण जवळच्या सीसीसी सेंटरमध्ये दाखल करण्यास सांगितले आहे. काही खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये संख्या कमी झाल्याने तीन खासगी हॉस्पिटल बंद झाले आहेत. काहींनी बंद करण्याचे पत्र दिले आहे. रुग्णसंख्या दिवाळीनंतरही कमी राहिल्यास कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळवणे शक्य होईल. 
-डॉ. एन. सी. चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image