कोरोना सुविधांसाठी लोकसहभागातून तालुके ‘आत्मनिर्भर’ 

vhentilater machine
vhentilater machine

जळगाव : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आरक्षित रुग्णालय पॉझिटिव्ह रुग्णांसाठी अपुरी पडताहेत. त्यामुळे आपल्या तालुक्यालाच ऑक्सिजन बेडची सुविधा लोकसहभागातून साकारण्याची भन्नाट कल्पना चोपडा तालुक्यासह अमळनेर, पाचोरा, एरंडोल, फैजपूर येथे अंमलात येत आहे. नुसती कल्पनाच नाही, तर काही तालुक्यांनी लोकसहभागातून ‘आत्मनिर्भर’ होत ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन पाइपलाइन केली आहे. कोरोनाचा काळ संकटाचा असला, तरी आपल्या लोकांना कोरोनाच्या आजारातून आपल्याच लोकांनी वाचवीत ‘आत्मनिर्भर’ होत असल्याचा संदेश राज्यात वरील तालुक्यांतील नागरिकांनी दिला आहे. 
शासन आपल्या स्तरावर बाधित रुग्ण, लक्षणं असलेल्या रुग्णांच्या उपचाराची सोय करीत आहे. मात्र, शासन तरी किती करणार? कोरोनाबाधितांना वाचविण्यासाठी ऑक्सिजन बेड, पाइपलाइनची गरज, आयसीयू रूम, व्हेंटिलेटरची गरज असते. ती शासनाने केवळ कोविड रुग्णालयात केली आहे. तालुकास्तरावर कोविड केअर सेंटरची निर्मिती केली आहे. मात्र, तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर तालुक्याच्या सेंटरमध्ये उपचार झाले पाहिजेत, यासाठी चोपड्यात शेतकरी सुकाणू समितीचे सदस्य एस. बी. पाटील यांनी लोकसहभागातून १०० ऑक्सिजन बेडची निर्मिती केली. विशेष म्हणजे, त्यांना कोणत्याही पक्षाकडून निधी घेतला नाही. सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनीच सहभाग घेतला. केवळ व्हॉट्सॲपवर आवाहन करून मदत मिळविली. चोपडा कोविड केअर सेंटरमध्ये बेडशीटसपासून सर्वच साधने, सुविधा लोकसहभागातून केल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना तेथेच उपचार करण्यात येत आहेत. पीपीई किट, इन्व्हर्टर, एक्स-रे युनिट, डसबीन, सॅनिटायझर, रोज शंभर पाण्याचे जार दिले. पालिकेचे अधिकारी व सर्व खासगी डाॅक्टरांची बैठक घेऊन, नागरिकांशी समन्वय साधत लोकसहभागातून कार्य होत आहे. चोपड्याचा हाच पॅटर्न आता जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात राबविण्याचा निर्धार जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केला आहे. लोकसहभागातून अमळनेर, पाचोरा, एरंडोल, जामनेर, फैजपूर येथेही ऑक्सिजन बेडनिर्मिती सुरू आहे. 
 
पाचोऱ्यात २० ऑक्सिजन बेड 
पाचोरा येथे लोकसहभागातून २० ऑक्सिजन बेडची निर्मिती झाली. ग्रामीण रुग्णालयात ७० बेडची निर्मिती झाली. रुग्ण व अधिकारी, नातेवाइकांना संवाद साधण्यासाठी डिजिटल पब्लिक अनाउंसर सिस्टिम तयार केली. ४० थर्मामीटर, ऑक्सिमीटर घेतले. आमदारांनी फंडाशिवाय २५ जादा बेड दिले. सभापती सतीश शिंदे यांनी २० बेड दिले. रमेश मोर यांनी शक्तिधाम मंगल कार्यालय महिनाभर मोफत होते. शांताराम पाटील यांनी त्यांचा एसी लॉन्स कोरोना रुग्णांसाठी मोफत दिले. सोबतच स्वप्नशक्ती रेसिडेन्सी हाॅटेलमधील दहा रूम डॉक्टरांना राहण्यासाठी माेफत दिल्या, अशी माहिती पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com