जळगावात जिल्‍ह्‍यात कोरोना राहिला अवघा एकच टक्‍का

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 November 2020

गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा एक हजार २७२ वर कायम आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत सोमवारी एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. 

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत असताना आता एकूण रुग्णांपैकी केवळ एक टक्काच रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. सोमवारी (ता.९) प्राप्त झालेल्या अहवालात अवघे ३९ रुग्ण आढळून आले, तर दिवसभरात ५३ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. 
जळगाव जिल्ह्यात दोन महिन्यांत कोरोनाबाधितांचा आलेख खाली उतरत आहे. नवे बाधित कमी व बरे होणारे अधिक या समीकरणामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या साडेपाचशेपर्यंत मर्यादित राहिली असून, ही संख्या एकूण रुग्णांच्या केवळ एक टक्का आहे. सोमवारी नव्याने ३९ रुग्ण बाधित आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार ५८९ झाली असून, बरे झालेल्यांचा आकडा ५१ हजार ७६० वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे एकूण मृत्यूचा आकडा एक हजार २७२ वर कायम आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत सोमवारी एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव व भुसावळ शहरातच सोमवारी जास्त रुग्ण आढळले. जळगाव शहरात ११, तर भुसावळला १९ नव्या रुग्णांची भर पडली. चोपडा- दोन, यावल- एक, चाळीसगाव- पाच याच ठिकाणी रुग्णांची नोंद झाली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus one percentage active patient