कोरोनाचा दिवसभरात एकही नाही मृत्‍यू; जळगाव शहरासाठीही दिलासा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 October 2020

जळगाव जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट हे दोन महिने कोरोना संसर्गात अत्यंत तीव्रतेचे गेले. सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून मात्र रुग्ण सातत्याने घटत असून रिकव्हरीचे प्रमाणही वाढत आहे.

जळगाव : कोरोना संसर्गात मंगळवारचा दिवस अत्यंत दिलासादायक गेला. मंगळवारी नव्याने बाधित रुग्णांची संख्या शंभराच्या आतच नोंदली गेली, तर दिवसभरात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. बरे झालेल्या २३० रुग्णांसह बरे होण्याचे प्रमाणही ९३ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. 
जळगाव जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट हे दोन महिने कोरोना संसर्गात अत्यंत तीव्रतेचे गेले. सप्टेंबरच्या पंधरवड्यापर्यंत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती. त्यानंतर गेल्या महिनाभरापासून मात्र रुग्ण सातत्याने घटत असून रिकव्हरीचे प्रमाणही वाढत आहे. चार महिन्यात आज दुसऱ्यांदा दिवसभरात एकही मृत्यूची नोंद झाली नाही. शिवाय, याच आठवड्यात दिवसभरातील नव्या कोरोना बाधितांची संख्या शंभराच्या आत राहण्याचा दुसरा दिवस होता. आजच्या ९१ रुग्णांसह जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५१ हजार ३०४वर पोचली आहे. याआधी रविवारी (ता.११) जिल्ह्यात ७६ नवे रुग्ण आढळले होते. तर गेल्या २४ तासांत २३० रुग्ण बरे झाल्यानंतर एकूण बरे झालेल्यांचा आकडाही ४७ हजार ६२६ झाला आहे. रिकव्हरीचे प्रमाण तब्बल ९२.८३ टक्क्यांवर पोचले आहे. 

जळगाव शहराला दिलासा 
रविवारी जळगाव शहरात अवघे ८ रुग्ण आढळले होते. मात्र, सोमवारी हा आकडा वाढून ८४ झाला. मंगळवारी पुन्हा शहरातील नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये घट झाली. दिवसभरात अवघे १२ रुग्ण सापडले. अन्य ठिकाणी असे आढळले रुग्ण : जळगाव ग्रामीण ३, भुसावळ १६, अमळनेर ९, चोपडा ५, पाचोरा २, भडगाव ४, धरणगाव ५, यावल २, जामनेर ८, रावेर ३, पारोळा १, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर ३, बादवड १, अन्य जिल्ह्यातील २. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon coronavirus update no death days