जळगाव मनपाची असमर्थता; परिवहन नागरी सुविधाच नाही

कैलास शिंदे
Saturday, 21 November 2020

परिवहन समिती स्थापन झालेली नाही. मात्र त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. नगरसेवकांशी चर्चा करून समिती स्थापनेबाबत प्रस्ताव देऊन त्या माध्यमातून शहर बससेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. 
-सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, आमदार, जळगाव शहर भाजप 

जळगाव : आम्ही सत्तेवर आल्यास शहरात परिवहन सेवा सुरू करण्यात येतील, चांगल्या पद्धतीच्या बसच्या माध्यमातून शहर बससेवा देण्यात येईल, असे गोंडस आश्‍वासन निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेले असते. सोबत चांगल्या बससेवेचा फोटोही असतो. परंतु निवडणुका झाल्यावर या बस कधीच दिसत नाहीत. जळगाव महापालिकेतही सध्या तीच स्थिती आहे. नागरिकांना परिवहन सुविधा तर नाहीच परंतु या ठिकाणी समितीची स्थापनाच करण्यात आलेली नाही. 
जळगाव महापालिकेतर्फे जळगावकरांसाठी परिवहन समितीच्या माध्यमातून शहर बससेवा सुरू करण्यात आली होती. मात्र ती केवळ बसस्थानकास जागा नसल्याच्या कारणाने बंद पडली; परंतु त्यानंतर या महापालिकेत बससेवा सुरूच करण्यात आलेली नाही. शहरात बससेवा सुरू करण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली, मात्र त्यानंतर याकडे लक्षच देण्यात आले नाही. 
 
सत्ताधाऱ्यांना विसर 
महापालिका निवडणुकीत शहरात मुंबई आणि पुण्याप्रमाणे शहर बससेवेची सुविधा देण्यात येईल, असे आश्‍वासन प्रचाराच्या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. त्या वेळी विरोधक आणि आज महापालिकेत सत्तेवर असलेले भारतीय जनता पक्ष यांनीही आमची सत्ता आल्यास शहरात चांगली बससेवा देणार असल्याचे आपल्या जाहीरनाम्यात आश्वासन दिले आहे. मात्र आज सत्ता येऊन दोन वर्षे झाली तरी महापालिकेने ही सेवा सुरू केलीच नाही. आपल्या जाहीरनाम्यातील दिलेल्या आठवणीचाही सत्तेवर आल्यानंतर भाजपला विसर पडला आहे. 

 

परिवहन समितीच नाही 
गेल्या दोन वर्षांपासून परिवहन समितीही स्थापन केली नसल्याचे दिसून आले. महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासन दोन्हीही त्याबाबत अनभिज्ञ आहेत. ही समिती नसल्यामुळे केंद्राकडून शहर बससेवा सुरू होणार नाही, परंतु केंद्राकडून महापालिकेत बससेवा सुरू करण्यासाठी बस दिल्या जातात. त्या माध्यमातून शहरात सेवा सुरू होतात. या ठिकाणी परिवहन समितीच नसेल तर केंद्रांच्या योजनेच्या फायद्याला जळगावकरांना मुकावे लागणार आहे. त्यामुळे ही समिती महापालिका स्थापन करून जळगावकरांना शहर बससेवेची सुविधा उपलब्ध करून देणार काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 
 
महापालिकेत सद्यःस्थितीत परिवहन समिती अस्तित्वात नाही, त्यामुळे या ठिकाणी शहर बससेवाही सुरू नाही. त्याबाबत प्रस्ताव आल्यानंतर समितीची स्थापना करण्यात येईल. 
डॉ. सतीश कुळकर्णी, आयुक्त, महापालिका, जळगाव 
 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation transportation is not a civic amenity