धक्कादायक : आईचे रक्त नमुने घेण्यासाठी मुलगा कोरोना वॉर्डात   

बुधवार, 1 जुलै 2020

शिवकॉलनी येथील 69 वर्षीय महिलेवर उपचार सुरू असताना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास तिचा मुलगा नितीन आनंदा चाचरे हा रुग्णालयात आला, विनापरवानगी वॉर्डमध्ये शिरून दाखल रुग्ण आईचे रक्ताचे नमुने संकलित करून तो घेऊन गेला.

जळगाव : "कोरोना' रुग्णालयात उपचारार्थ दाखल महिलेच्या मुलाने कुठलीही परवानगी नसताना वॉर्डात बळजबरीने शिरून त्याच्या आईचे रक्ताचे नमुने संकलित करून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुठलेही संरक्षित कीट न वापरता आणि डॉक्‍टर व नियुक्त पोलिसांशी हुज्जत घालत रक्त नमुने घेऊन गेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

शहरातील आकाशवाणी चौकातील गणपती मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल कोरोना संक्रमित रुग्णांसाठी अधिग्रहीत करण्यात आले आहे. येथे उपचारार्थ दाखल शिवकॉलनी येथील 69 वर्षीय महिलेवर उपचार सुरू असताना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास तिचा मुलगा नितीन आनंदा चाचरे हा रुग्णालयात आला, विनापरवानगी वॉर्डमध्ये शिरून दाखल रुग्ण आईचे रक्ताचे नमुने संकलित करून तो घेऊन गेला. जाताना येथे नियुक्त डॉक्‍टर पोलिस आणि स्टाफशी हुज्जत घालून त्याने रक्त नमुने घेऊन गेल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

डॉक्‍टरांशी हुज्जत 
गणपती रुग्णालयात शासकीय ड्यूटीवर नियुक्त डॉक्‍टर स्वप्नील कळसकर यांनी नितीन याला वॉर्डात जाण्यास विरोध केला. रक्तनमुने तुम्हाला संकलित करता येणार नाही व खासगी लॅबसाठी ते पाठवताही येत नाही. मात्र, त्याने काहीएक ऐकून न घेता, सुरक्षाकिट न घालता रक्तनमुने संकलित केले. पोलिस कर्मचारी विजय जाधव, डॉ. आदित्य बेंद्रे, सिस्टर शिल्पा पाटील आदींनी विरोध केल्यावर त्यांना न जुमानता गोंधळ घालून त्याने शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध डॉ. वैभव सोनार यांनी तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.