राज्यात दैनंदिन कोरोना चाचणीत नाशिक राज्यात प्रथम 

राज्यात दैनंदिन कोरोना चाचणीत नाशिक राज्यात प्रथम 

जळगाव : कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात दैनंदिन चाचण्यांवर भर देण्यात येत आहे. यात राज्यात सर्वाधिक १२ हजार ४०२ चाचण्या नाशिक जिल्ह्यात होत आहेत. त्यापाठोपाठ पुणे, ठाणे, मुंबई, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, नगर या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन दोन हजारांपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचा क्रमांक लागतो. 

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले, की जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या २४ तासांत सुमारे दोन हजार ७२ चाचण्या झाल्या. आत्तापर्यंत ६३ हजार १४६ व्यक्तींच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. दोन महिन्यांत जिल्ह्यात चाचण्यांचे प्रमाण दहापटीने वाढले आहे. सद्य:परिस्थितीत दैनंदिन चाचण्या करण्यामध्ये जळगाव जिल्हा राज्यात अकराव्या स्थानी पोचला आहे. मे अखेर जिल्ह्यात दैनंदिन २०० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात येत होत्या. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने दोन महिन्यांत तपासणीची साधने वाढल्याने चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. जिल्ह्यात ७ ऑगस्टला एक हजार ९११, तर ८ ऑगस्टला दोन हजार ७२ अशा एकूण तीन हजार ९८३ चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांची संख्या दोन हजार ३३७, तर ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांची संख्या एक हजार ६४५ इतकी आहे. 


जळगाव जिल्ह्याचा मृत्युदर चार टक्क्यांवर 
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत (८ ऑगस्ट) १३ हजार ८८७ बाधित रुग्ण आढळले असून, त्यांपैकी नऊ हजार ५८८ इतके रुग्ण म्हणजेच ६९ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. सध्या जिल्ह्यात फक्त तीन हजार ६९८ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच आत्तापर्यंत ६०१ बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यात दोन महिन्यांपूर्वी १२ टक्के असलेला मृत्युदर सध्या केलेल्या विविध उपाययोजनांमुळे ४.३२ टक्क्यांवर आला आहे. 

 
संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com