पहिले निमंत्रण खडसेंनाच : महाजनांचा दावा; खडसे म्हणतात..बोलणं झालं, जायचं बघू 

सचिन जोशी
Monday, 12 October 2020

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून पक्ष नेतृत्वावर व विशेषत: फडणवीसांवरच नाराज असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी गेल्या महिन्यात थेट त्यांचे नाव घेत टीका करत लवकरच राजकीय भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले होते.

जळगाव : जिल्ह्यातील आरोग्य सेवेत जामनेरातील ग्लोबल हॉस्पिटलच्या माध्यमातून नवी मुहूर्तमेढ रोवली जात असताना त्यानिमित्त नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात, त्याबाबत उत्सुकता आहे. या हॉस्पिटलच्या लोकार्पण ठरल्यानंतर पहिला फोन आपण खडसेंनाच केला, असा दावा गिरीश महाजनांनी केलांय.. खडसेंनीही महाजनांचा फोन आला होता.. पण, जाण्याबाबत उद्याचे ठरवू, असे उत्तर दिले. 

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिल्यापासून पक्ष नेतृत्वावर व विशेषत: फडणवीसांवरच नाराज असलेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी गेल्या महिन्यात थेट त्यांचे नाव घेत टीका करत लवकरच राजकीय भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून त्यांच्या कथित पक्षांतराची चर्चा सुरु झाली. गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई वारी केल्याने त्यातच शरद पवारांची भेट ठरल्याचेही बोलले गेले. प्रत्यक्षात ती भेट झालीच नाही. उलटपक्षी खडसेंनी भाजपच्या प्रदेश कार्यसमितीच्या बैठकीस व्हर्चुअली हजेरी लावली. 

फडणवीस आज जिल्ह्यात 
एकीकडे खडसे नाराज असताना त्यांच्या स्नुषा खासदार श्रीमती रक्षा खडसेंनी मुंबईत फडणवीसांची भेट घेतली, या भेटीचेही विविध अर्थ लावले जात आहेत. अशातच फडणवीस मंगळवारी जामनेरातील जी.एम. फाउंडेशन संचालित ग्लोबल महाराष्ट्र हॉस्पिटलचे उदघाटन करण्यासाठी जिल्ह्यात येत आहेत. त्यामुळे खडसे या सोहळ्यास उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

खडसेंनाच पहिले निमंत्रण 
रविवारी मुंबईहून परतलेल्या खडसेंना जामनेरातील हॉस्पिटल लोकार्पण सोहळ्यास जाणार का, असा प्रश्‍न केला असता त्यांनी निमंत्रण आल्यावर बघू, असा पवित्रा घेतला होता. मात्र, ज्यांच्या पुढाकारातून हे हॉस्पिटल उभे राहिलेय, त्या महाजनांनी मात्र सोहळा निश्‍चित झाल्याबरोबर पहिला फोन आपण खडसेंनाच केला, असा दावा केला आहे. आज भाजप महिला आघाडीतर्फे राज्य सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले, त्यावेळी महाजन उपस्थित होते. तेव्हा त्यांनी हा दावा केला. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या सोहळ्यास हजर राहतील, पालकमंत्री गुलाबराव पाटील मात्र काही कामानिमित्त बाहेर असल्याने ते उपस्थित राहू शकणार नाही, असेही महाजन म्हणाले. 

फोन आला
याबाबत खडसेंना विचारले असता, रविवारी महाजनांचा फोन आला होता. परंतु, या कार्यक्रमाला जायचे की नाही, हे अद्याप ठरवले नाही. मंगळवारीच अन्य कामे व स्थिती पाहून जाण्याबाबत ठरवू, असे ते म्हणाले. 
 
खडसे पक्ष सोडणार नाहीत 
खडसे आमचे व पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या नाराजीबद्दल माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याने बोलण्याची गरज नाही. पक्षातील वरिष्ठ त्यांच्या नाराजीची दखल घेतील. खडसे नाराज असतीलही, मात्र ते पक्ष सोडणार नाही, असाही दावा महाजनांनी केला. 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon devendra fadnavis tour jamner in hospital opening