esakal | स्वतःची लॅब असल्याने शासनाचे वाचले सव्वातीन कोटी 
sakal

बोलून बातमी शोधा

स्वतःची लॅब असल्याने शासनाचे वाचले सव्वातीन कोटी 

जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उद्रेक झाला नसता. सोबतच खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी स्वॅब पाठविल्यानंतर शासनाला दर महिन्याला कोट्यवधींची बिले द्यावे लागत होती. 

स्वतःची लॅब असल्याने शासनाचे वाचले सव्वातीन कोटी 

sakal_logo
By
देवीदास वाणी

जळगाव  : जिल्हा कोविड रुग्णालयात स्वॅब तपासणीसाठी स्वतःची प्रयोगशाळा (लॅब) सुरू झाल्याने महिन्याभरात शासनाचे तब्बल सव्वातीन कोटी रुपये वाचले आहेत. रुग्णाचा अहवाल येण्याचाही कालावधी चार ते सहा दिवसांवरून २४ तासांवर येऊन ठेवला आहे. रुग्णांचे अहवाल लवकर येऊ लागल्याने रुग्णांवर तत्काळ उपचार करणेही आरोग्य यंत्रणेला शक्य होत आहे. 

लॅब उभारणीसाठी एक कोटी ५० लाखांचा खर्च झाला आहे. राज्यात १६ ठिकाणी कोरोना स्वॅब तपासणी लॅबला शासनाने मंजुरी दिली होती. त्यात जळगावचा समावेश होता. येथील लॅबमध्ये दोन शिफ्टमध्ये तीन-तीन तंत्रज्ञ काम करतात. 
एप्रिल, मे महिन्यात शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढत होते. रुग्णांचे स्वॅब घेऊन धुळे, पुणे, मुंबई, नाशिक येथील प्रयोगशाळांमध्ये पाठविले जात होते. रुग्णांचा अहवाल येण्यास चार ते सहा दिवस लागत होते. तोपर्यंत रुग्ण गावभर फिरून इतरांनाही बाधित करीत होता. अहवाल आल्यानंतर तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह अहवालावरून त्याच्यावर उपचार होत होते. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असताना, अहवाल लवकर आला असता, तर त्यांच्यावर तत्काळ उपचार करणे लागलीच शक्य झाले असते. जळगाव शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा उद्रेक झाला नसता. सोबतच खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी स्वॅब पाठविल्यानंतर शासनाला दर महिन्याला कोट्यवधींची बिले द्यावे लागत होती. 

जिल्हा कोविड रुग्णालय व महाविद्यालयातच २२ जूनला शासनाने स्वॅब तपासणी प्रयोगशाळा सुरू केली. मायक्रो बॉयोलॉजी विभागप्रमुख डॉ. किशोर इंगोले यांच्या नेतृत्वाखाली स्वॅब तपासणी सुरू झाली. सुरवातीस शंभर ते दीडशे स्वॅब तपासले जात होते. आता ३०० ते ३५० रुग्णांचे स्वॅब रोज तपासले जातात. त्यापेक्षा अधिकचे स्वॅब धुळे, पुणे येथे पाठविले जातात. ज्या रुग्णांचे अहवाल त्वरित येणे आवश्‍यक आहे. त्यांची येथील लॅबमध्येच तपासणी करून अहवाल २४ तासांच्या आत दिला जातो. यामुळे रुग्णांवर उपचार करता येतात. यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा मृत्युदर ४ टक्क्यांपेक्षाही कमी झाला आहे. पूर्वी हा दर १४ ते १५ टक्क्यांपर्यंत होता. 

कोरोना लॅब जळगावला झाल्याने 
*रुग्णांच्या स्वॅबचा अहवाल लवकर येतो. 
*रुग्णांवर तत्काळ उपचार सुरू करता येतात. 
*रुग्ण उपचारासाठी लवकर आल्याने मृत्यू होण्याची शक्यता कमी. 
*अहवाल येताच रुग्णांसह संपर्कातील सर्वांची स्वॅब तपासणी. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image