जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने ठोकले भाजपविरुद्ध शड्डू! 

sena bjp
sena bjp

जळगाव : एके काळचा मित्र असलेल्या भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आज जिल्ह्यात आव्हान दिले आहे. आगामी ग्रामीण व शहर निवडणुकीत थेट आमने-सामने करून भाजपला पराभूत करू अशी घोषणाच शिवसेनेचे उपनेते व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. भाजपचे जिल्ह्यातील नेत्यांनी या आव्हानाला कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नसली, तरी आगामी काळात भाजप विरुद्ध शिवसेना यांचा संघर्ष होणार असे चित्र दिसत आहे. 

राज्यात शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती असताना जळगाव जिल्ह्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष एकोप्याने लढून यश मिळवीत होते. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी युतीधर्म पाळून जळगाव रावेर मतदार संघातून भाजपचा उमेदवार निवडून आणला होता. विधानसभा निवडणूक यावेळी युतीतर्फे लढण्यात आलेली असली तरी जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवाराच्या विरोधात भाजपने बंडखोर उमेदवार उभे केले असल्याचा आरोप शिवसेनेने जाहीरपणे केला होता. या निवडणुकीतच दोन्ही पक्षात बेबनाव झाल्याचे उघडपणे दिसून आले. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या विजयी आमदारांनी थेट भाजपवर गद्दारीचा आरोप करीत टीका सुरू केली होती. निवडणुकीनंतर मुंबई येथे झालेल्या शिवसेनेच्या पक्ष मेळाव्यात जिल्ह्यातील शिवसेना आमदारांनी भाजपने कशा प्रकारे मतदार संघात बंडखोर उमेदवार उभे करून पाडण्याचा प्रयत्न केला याचा पाढाच नेत्यांसमोर वाचला. कोणत्याही परिस्थितीत भाजपशी युती नकोच अशा आग्रही धरला असल्याचे सांगण्यात येत आहे. 
शिवसेनेच्या नेत्यांनी आता भारतीय जनता पक्षावर उघडपणे टीका सुरू केली आहे. पाचोरा येथे नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या कार्यालय उद्‌घाटन कार्यक्रमात शिवसेनेची मुलूख मैदान तोफ व उपनेते तसेच राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट शिवसेनेला आव्हान दिले, यावेळी त्यांनी म्हटले आहे, की भाजपचे खासदार आमच्याच पाठिंब्यावर विजयी झाले आहेत, आम्ही त्यांचाही टांगा पलटी करू शकतो. तसेच भाजप जिल्ह्यात एक नंबरवर असल्याचा दावा करीत आहेत. परंतु तो खोटा आहे. आमच्याकडे पाच आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आम्ही क्रमांक एकवर आहोत. या शिवाय आगामी ग्रामीण आणि शहरी निवडणुकीत आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरून भाजपचा पराभव करणार आहोत. या शिवाय पुढच्या विधानसभा निवडणुकीत आम्ही थेट सामना करून दहा आमदार निवडून आणू असा इशाराही त्यांनी दिला आहे. या शिवाय शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दिलेल्या मुलाखती पाटील यांनी आमची यापुढील वाटचाल शिवसेनेशिवाय असेल असे थेट जाहीर केले आहे. 
शिवसेनेचे पाचोरा मतदार संघाचे आमदार किशोर पाटील हे सुद्धा या सभेत भाजपवर तुटून पडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला भाजपतील काही मंडळी बदनाम करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जिल्ह्यातील भाजप नेते "कोरोना'संदर्भात झालेल्या प्रकारास पालकमंत्र्यांना बदनाम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी आता थेट भाजप विरुद्ध रणशिंग फुंकल्याचे दिसत आहे. जिल्ह्यातील भाजप नेत्यांना हे थेट आव्हानच आहे. 

शिवसेनेच्या टार्गेटवर महाजन 
विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात भाजपचे नेतृत्व माजी मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी केले होते. निवडणुकीत महाजन यांनीच आपल्याविरुद्ध भाजपतर्फे बंडखोर उमेदवार उभे करून पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही शिवसेनेच्या आमदारांनी केला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या टार्गेटवर सद्या भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन असल्याचे दिसत आहे. शिवसेना नेत्यांच्या आरोपावर गिरीश महाजन यांची सद्या तरी कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र आगामी काळात शिवसेनेप्रमाणे भाजपही आक्रमक होण्याची शक्‍यता असून येत्या ग्रामीण आणि शहरी निवडणुकीत दोन्ही पक्षात जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे असून कोण कुणावर भारी पडतो हेच आगामी काळात दिसून येईल. मात्र सद्या तरी दोन्ही पक्ष एकमेकांना आव्हान देतील हे निश्‍चित आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com