esakal | दिवाळीला मार्केट बूम; चारचाकी वाहनांसाठी महिन्यापेक्षा जास्त ‘वेटिंग’ 
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळीला मार्केट बूम; चारचाकी वाहनांसाठी महिन्यापेक्षा जास्त ‘वेटिंग’ 

सर्वच क्षेत्रांपेक्षा यंदाच्या उत्सवकाळात ऑटोमोबाईल क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरवी दिवाळीला वाहनांचे बुकिंग, डिलिव्हरी एकाच वेळी होते.

दिवाळीला मार्केट बूम; चारचाकी वाहनांसाठी महिन्यापेक्षा जास्त ‘वेटिंग’ 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : दर वर्षीपेक्षा यंदाची दिवाळी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी, विशेषत: चारचाकी वाहनांच्या मार्केटसाठी ‘बूम’ करणारी ठरली. यंदाच्या या उत्सवात नेहमीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक वाहनांचे बुकिंग झाले. जवळपास सर्वच ब्रॅन्डच्या कंपन्यांना मागणी असून, महिन्यापेक्षा जास्त काळासाठी वाहनांचे डिलिव्हरी ‘वेटिंग’वर आहे. 

 वाचा- जिल्हा रुग्णालयाचा चमत्कार; झिंगलेलेे अकरा मद्यपींची वैद्यकीय तपासणी ‘निल’! 

कोरोनाकाळात लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झालेली असताना त्यामुळे प्रत्येक क्षेत्र प्रभावित झाले. अनेक कंपन्या डबघाईस आल्या, अनेक बंद पडल्या. त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. अशा स्थितीत अर्थव्यवस्था कशी सावरेल, हा प्रश्‍न होता. दसरा, दिवाळीच्या उत्सवात बाजार सावरेल, अशी चिन्हे होती. दसऱ्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र, दिवाळीत मार्केटमध्ये बऱ्यापैकी तेजी आली. 

ऑटोमोबाईलला ‘अच्छे दिन’ 
सर्वच क्षेत्रांपेक्षा यंदाच्या उत्सवकाळात ऑटोमोबाईल क्षेत्राला ‘अच्छे दिन’ आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एरवी दिवाळीला वाहनांचे बुकिंग, डिलिव्हरी एकाच वेळी होते. यंदा मात्र, वेगळा अनुभव आहे. दोन महिन्यांपूर्वी बुकिंग करून ठेवलेल्या चारचाकी वाहनांचे डिलिव्हरी दसरा, दिवाळीला पार पडले. मात्र, दिवाळीच्या मुहूर्तावर ज्यांनी वाहनांचे बुकिंग केले, त्यांना महिन्यापेक्षा जास्त काळासाठी वाहन मिळण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे, अशी जवळपास प्रत्येक ब्रॅन्डची स्थिती आहे. 

शेकड्यांत बुकिंग 
सर्वाधिक मार्केट शेअर असलेल्या एका कंपनीच्या दोन ब्रॅन्डच्या वाहनांसाठी दोन-चारशे बुकिंग झाले असून, या वाहनांसाठी महिना, दोन महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे, तर त्याखालोखाल अन्य ब्रॅन्डेड वाहनांचे बुकिंगही मोठ्या प्रमाणात झाले आहे. 

आरटीओत गर्दी 
वाहनांच्या मोठ्या प्रमाणावरील विक्रीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीनिमित्त तीन दिवस बंद राहिलेल्या आरटीओ कार्यालयात मंगळवारी (ता. १७) मोठी गर्दी झाली होती. वाहन परवान्यासह वाहनांच्या नोंदणीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. सायंकाळपर्यंत कार्यालय गर्दीने गजबजले होते.