कोरोनाचा मृत्यूदर कमी करणार...सोबत विस्कटलेली घडी बसविणार ; प्रभारी "डीन' डॉ. जयप्रकाश रामानंद 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

भुसावळ येथील 82 वर्षीय "कोरोना'बाधित वृद्धेचा शौचालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी यापूर्वीचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली.

जळगाव :  जिल्ह्यात वाढत असलेला "कोरोना'चा प्रचंड संसर्ग रोखणे व जिल्ह्यात वाढलेला मृत्यूदर कमी करणे ही प्रमुख उद्दिष्ट्ये डोळ्यांसमोर आहे. यासोबतच वैद्यकीय महाविद्यालयाची विस्कटलेली घडीही बसवू, असा विश्‍वास नवनियुक्त अधिष्ठाता (डीन) डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी आज व्यक्त केला. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूर्णवेळ अधिष्ठाता म्हणून डॉ. रामानंद आज दुपारी रुजू झाले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांनी स्वागत केल्यानंतर त्यांनी प्रभारी "डीन' डॉ. मारुतो पोटे यांच्याकडून पदभार स्वीकारला. डॉ. रामानंद यांच्या नियुक्तीचे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी काढले होते. भुसावळ येथील 82 वर्षीय "कोरोना'बाधित वृद्धेचा शौचालयात झालेल्या मृत्यूप्रकरणी यापूर्वीचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली. त्यांच्या रिक्त जागी डॉ. रामानंद यांची नियुक्ती झाली आहे. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. जळगाव जिल्ह्यातील "कोरोना'च्या परिस्थितीसंदर्भात सखोल चर्चा केली. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी अधिष्ठातापदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी पूर्वीचे प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे "सीईओ' डॉ. बी. एन. पाटील, पूर्वीचे अधिष्ठाता डॉ. खैरे उपस्थित होते. 

डॉ. रामानंदांकडे पूर्णवेळ जबाबदारी 
डॉ. जयप्रकाश रामानंद यापूर्वी कोल्हापूर येथे तीन वर्षे, तर धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा गेल्या दोन वर्षांपासून अधिष्ठातापदाचा कारभार पाहत होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी धुळे महाविद्यालयाच्या पदभार सहाय्यक प्राध्यापक डॉ. मयूर पवार यांच्याकडे सोपविला. त्यांना आज धुळ्यातून कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे आता ते जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून पूर्णवेळ कार्यभार सांभाळतील. 

सहकाऱ्यांसोबत झोकून कामावर भर 
पदभार स्वीकारल्यानंतर डॉ. रामानंद म्हणाले, की जिल्ह्यातील परिस्थिती निश्‍चितपणे गंभीर आहे. जिल्ह्याचा मृत्यूदरही राज्यात सर्वाधिक आहे. यामुळे या ठिकाणी सर्वांना विश्‍वासात घेऊन काम करावे लागेल. "कोरोना' नियंत्रणासाठी कुठल्याही परिस्थितीत निधी व यंत्रसामुग्री कमी पडू देणार नसल्याचे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. सर्व सहकाऱ्यांसोबत झोकून देऊन काम करण्यावर आपला भर राहील. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Dr. Jaiprakash Ramanand, Dean in charge Medical college