एकनाथ खडसेंना खरच ‘कोरोना’ झाला आहे का ?
कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह येणे याबद्दल मला संशय आहे. साधा नगरसेवक जरी कोविड पॉझिटिव्ह आला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करतो.
जळगाव : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. मात्र त्यांच्या या ‘कोरोना’आजारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.
एकनाथ खडसे यांना ‘ईडी’ (सक्त वसुली संचालनालयाची) नोटीस आली होती. त्यांना चौकशीसाठी ३० डिसेंबरला पाचारण करण्यात आले होते. त्यासाठी ते मुंबई येथे रवाना झाले होते. तेथे त्यांना ताप, खोकला अशी लक्षणे जाणवू लागली. त्यांची स्वॅब तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना डॉकटरांनी चौदा दिवस क्वारंटाइन राहण्याचा सल्ला दिला. त्यानुसार ते क्वारंटाइन झाले आहेत. याबाबत त्यानी ‘ईडी’च्या कार्यालयाला पत्र देत कळविले आहे. त्यानुसार त्यांनीही त्यांची मुदतवाढ मंजूर करून चौदा दिवसानंतर चौकशीसाठी हजर राहावे, असे कळविले आहे. त्यामुळे खडसे ईडीसमोर चौदा दिवसांनंतर हजर होणार आहेत.
तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटतात..
खडसे यांच्या ‘कोरोना’आजारपणावरच आक्षेप घेण्यात आला आहे. जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी त्यावर आक्षेप घेत म्हटले आहे, की ‘ईडी’ची चौकशी लागल्यानंतर पुन्हा त्यांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह येणे याबद्दल मला संशय आहे. साधा नगरसेवक जरी कोविड पॉझिटिव्ह आला तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचे आवाहन करतो, मात्र एकनाथ खडसे हे राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. मात्र त्यांनी कुठेही अशी वाच्यता केली नाही.
पून्हा कोरोना चाचणी करा
एकंदरीतच हा सर्व प्रकार संशयास्पद आहे. वैद्यकीय अहवालामध्ये त्यांचा रिपोर्ट उपजिल्हा रुग्णालयात मुक्ताईनगर येथून २९ डिसेंबरला जळगाव वैद्यकीय महाविद्यालय येथे प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. मात्र त्यांच्या नावाचा म्हणजे एकनाथ गणपतराव खडसे, वय वर्ष ६०, ओपीडी क्रमांक ५५ ९७९ हा काढलेला आहे. एकंदरीत सर्व गुंतागुंत पाहता त्यांची पुन्हा वैद्यकीय कमिटी गठीत करून कोविड टेस्ट करावी, अशी मागणी होत आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे