खडसेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत ‘नाराजीनाट्य’; पहिल्याच बैठकीत अनुभव 

कैलास शिंदे
Thursday, 3 December 2020

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी बुधवारी जिल्हा कार्यालयात पक्षाची बैठक झाली. माजी आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार होते. 

जळगाव : राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर प्रथमच झालेल्या बैठकीस उपस्थित राहिलेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांना बैठकीतच नाराजीनाट्याचा अनुभव आला. माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांचा बॅनरवर फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली व माफी मागण्याची मागणी केली. 
खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर जळगाव जिल्ह्यातील पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाली नव्हती. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी बुधवारी जिल्हा कार्यालयात पक्षाची बैठक झाली. माजी आमदार, खासदार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीस उपस्थित राहणार होते. 
बैठकीस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार दिलीप सोनवणे, माजी आमदार मनीष जैन तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र पक्षाचे नेते अरुणभाई गुजराथी त्यांच्या नातलगाचे निधन झाल्याने गैरहजर होते. पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव विद्यमान आमदार अनिल पाटील हेसुद्धा काही कामानिमित्त बाहेरगावी असल्याने गैरहजर होते. माजी खासदार वसंतराव मोरे उच्च न्यायालयात काम असल्यामुळे बैठकीस उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. 

डॉ. सतीश पाटील गैरहजर 
माजी आमदार डॉ. सतीश पाटील बैठकीस गैरहजर होते, ते का उपस्थित नाहीत याचा खुलासा मात्र जिल्हाध्यक्षांनी केला नाही. ते नाराज असल्यामुळे बैठकीस आले नसल्याचीही चर्चा होती. 

कार्यकर्त्याने केली माफीची मागणी 
बैठक सुरू झाल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्याने ॲड. रोहिणी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या जाहिरातीत पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांचे फोटो होते, परंतु आमदार डॉ. सतीश पाटील यांचा फोटो नव्हता, असे लक्षात आणून देत नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून सतीशअण्णा पवारांसोबत असताना त्यांचा फोटो का नाही, अशी विचारणा करत या ठिकाणी नाराजी व्यक्त झाली. 

बैठकीत उमटले सूर 
जिल्हा बँकेचे संचालक संजय पवार यांनी त्यावर जाहिरातीत फोटो हेतुपुरस्सर नव्हे तर अनवधानाने राहून गेला आहे. त्यामुळे ते नाराज असतील तर त्यांची मी माफी मागतो, असे म्हणते या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. रोहिणी खडसे यांनी आम्ही पक्षात नवीन आहोत, काही चुका होत असतील तर सांभाळून घ्या, अशी विनंती केली. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse first meet ncp member displeasure