खडसे आज काय करणार पोलखोल; पत्रकार परिषदेकडे लक्ष

सकाळ वृत्तसेवा
Monday, 30 November 2020

बीएचआर संस्थेत गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे चौकशी सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधीत काही महत्त्वाची कागदपत्र, पत्रव्यवहार  आपल्याकडे असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. यामुळेच खडसेंनी सायंकाळी चार वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यामुळे आता काय समोर येते याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

जळगाव : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी (बीएचआर) गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणातील काही प्रमुख पुरावे आर्थिक गुन्हे शाखेने ताब्‍यात घेतले आहेत. आता या प्रकरणात नेमके कोण अडकते याकडे लक्ष असताना ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी याच प्रकरणवर दुपारी पत्रकार परिषद बोलावली आहे. यात खडसे कोणता मोठा खुलासा करतात याकडे लक्ष लागले आहे.

बीएचआर गैरव्यवहार प्रकरणामध्ये बँकेची मालमत्ता कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील काही ज्‍येष्‍ठ नेते, आमदार, खासदार आणि माजी मंत्र्याचा सुद्धा समावेश असल्‍याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपासुन याबाबत चर्चा रंगल्‍यानंतर खडसे यांनी तसा दावा देखील रविवारी केला होता. तसेच 'बीएआर संस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी 2018 पासून अनेक वेळा तक्रारी केल्या आहे. या सोबतच खासदार रक्षा खडसे यांच्या लेटरहेडवर देखील दिल्ली इथे अॅड. कीर्ती पाटील यांनी देखील तक्रार केल्‍याचे खडसे यांनी सांगितले होते.

म्‍हणूनच खडसेंची पत्रपरिषद
सदर प्रकरणात जिल्ह्यातील खासदार, आमदार व माजी मंत्र्यांचा समावेश आहे. प्रकरणाचा तपास सुरू असल्‍याने काही माहिती दिली तर चौकशीत हस्तक्षेप केल्यासारखे होईल. त्यामुळे नावे जाहीर करणे हे योग्य ठरणार नाही म्हणून एकदा का चौकशी पूर्ण झाली की दोन दिवसांत संपूर्ण माहितीसह पत्रकार परिषद घेणार आहे', असंही खडसे यांनी सांगितले होते. त्‍यानुसार कागदपत्र घेवून सदर पथक पुण्याकडे रवाना झाल्‍याने खडसेंनी आज पत्रकार परिषद बोलावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse press conference invite bhr fraud mater