नंदूरबारच्या राजकीय भूकंपावर खलबते; उदेसिंग पाडवी- खडसे भेट

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 October 2020

खडसे मुक्ताईनगर येथून जळगावात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील काही पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील या भेटीत व्यूव्हरचनेची आखणी झाल्याची माहिती मिळाली. 

जळगाव : भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथाराव खडसे यांची नंदूरबार जिल्ह्यातील माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी कार्यकर्त्यांसह भेट घेतली. त्यांच्या बंदद्वार भेटीत नंदूरबार जिल्ह्यातील राजकीय भूकंपाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. 
सोमवारी दुपारी खडसे मुक्ताईनगर येथून जळगावात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी नंदुरबार जिल्ह्यातील नेत्यांनी त्यांची भेट घेतली. नंदुरबार जिल्ह्यातील काही पालिकांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील या भेटीत व्यूव्हरचनेची आखणी झाल्याची माहिती मिळाली. 

यांनी घेतली भेट 
खडसे सोमवारी जळगावात दाखल झाल्यानंतर तळोद्याचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे, उपाध्यक्ष शांतीलाल साळी, शहादा शहर प्रमुख सुरेंद्र कुंवर, शहाद्याचे नगरसेवक इकबाल शेख, चंद्रकांत पाटील, बी. के. पाडवी, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे राजेंद्र वाघ, राजरत्न बिरारे, रोहित ढोडरे आदींच्या शिष्टमंडळाने खडसेंची भेट घेतली. 

निवडणुकीवर चर्चा 
सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तसेच शहादा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीत प्राथमिक चर्चा झाली. त्याचप्रमाणे खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्याने त्यांच्यासोबत भाजप तसेच इतर पक्ष सोडून राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक असलेल्या बड्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांच्या नावांवर चर्चा झाली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse udesing padvi meet