खडसेंच्या प्रवेशाचा घटस्‍थापना मुहूर्त हुकला; ते मात्र अजूनही बोलेना

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

खडसेंनी फडणवीसांविरोधात उघड टीका करत नवी राजकीय भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे महिनाभरापासून त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात ते मुंबईलाही जाऊन आले.

जळगाव : भाजपतील नाराज ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील कथित प्रवेशाचा घटस्थापनेचा मुहूर्त टळणार असून, आता पुढील आठवड्यापर्यंत त्यांच्या निर्णयासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असली तरी खडसे स्वत: मात्र त्याबाबत ‘नो कमेंट्स’ असेच म्हणत आहेत. 
भाजपतील राज्याच्या नेतृत्वावर नाराज असलेल्या खडसेंनी फडणवीसांविरोधात उघड टीका करत नवी राजकीय भूमिका घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे महिनाभरापासून त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा सुरू आहे. गेल्या आठवड्यात ते मुंबईलाही जाऊन आले. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाला शरद पवारांनी हिरवा कंदील दिल्याचे बोलले जात असले तरी त्याला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. 
 
दुजोरा नाहीच 
सूत्रांनुसार घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे सांगितले जात होते. त्यादृष्टीने त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर मोहीमही उघडली आहे. स्वत: खडसे मात्र त्याबाबत अद्याप खुलासा करीत नाहीत आणि ‘नो कमेंट्स’ म्हणत विषय टाळत आहेत. त्यांच्या कथित प्रवेशाचा मुहूर्त आता पुढल्या आठवड्यापर्यंत लांबणीवर पडला असून, बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या विषयाचा निर्णय लागू शकतो, असे बोलले जात आहे. अर्थात, त्याला अद्याप खडसे अथवा राष्ट्रवादी अशा दोघांकडून कुठलाही दुजोरा नाही. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknathrao khadse rashtrawadi congress entry issue