ग्रामपंचायतस्तरावर होणार कृषिविकास समितीची स्थापना 

देविदास वाणी
Saturday, 3 October 2020

समितीमध्ये सरपंच पदसिद्ध अध्यक्ष व उपसरपंच पदसिद्ध सदस्य राहतील, तसेच कृषी सहाय्यक सहसचिव, तर ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी सदस्य सचिव राहतील.

जळगाव  ः शेती व्यवसाय हा ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा व्यवसाय आहे. ग्रामीण भागातील सर्वच अर्थव्यवस्था शेती व्यवसायाशी निगडित आहे. हवामानातील बदल, लहरी पर्जन्यमान, कीडरोग, सुधारित जातीचे बियाणे उपलब्ध न होणे, शेतमालाच्या दरामध्ये अचानक घसरण इत्यादी कारणांमुळे शेतीमधून शाश्वत उत्पन्न मिळेल याची खात्री देता येत नाही. यावर स्थानिक स्तरावर विचारविनिमय करून मार्गदर्शन होण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतस्तरावर ग्राम कृषिविकास समितीची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. 

ग्रामीण भागातील शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी गावामधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा महत्तम वापर करणे, विविध योजना व प्रकल्प यामधून हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ४९ (४) नुसार प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये ग्राम कृषिविकास समिती स्थापन करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे. या समितीची मुदत ग्रामपंचायतीच्या मुदतीइतकीच राहील. ग्रामसेवक कृषी सहाय्यकांच्या समन्वयाने समितीच्या बैठकीचे आयोजन करतील. या समितीची सभा प्रत्येक महिन्यातून किमान एकदा घेण्यात येईल. शासनाच्या कृषिविषयक सर्व योजना (कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, जमीन आरोग्यपत्रिका अभियान, सूक्ष्म सिंचन योजना) ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रसार, प्रचार करण्यात येईल. 

बारा व्यक्तींचा असेल समावेश 
या समितीमध्ये गावातील कृषी व संलग्न क्षेत्राशी संबंधित असलेल्या किमान १२ व्यक्तींचा समावेश असणार आहे. या समितीमध्ये सरपंच पदसिद्ध अध्यक्ष व उपसरपंच पदसिद्ध सदस्य राहतील, तसेच कृषी सहाय्यक सहसचिव, तर ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी सदस्य सचिव राहतील. या समितीमध्ये ग्रामपंचायत सदस्य, प्रगतिशील शेतकरी (तीनपैकी किमान एक महिला सदस्य), विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, शेतकरी उत्पादक कंपनी शेतकरी गट यांचे प्रतिनिधी, महिला बचतगट प्रतिनिधी, कृषिपूरक व्यावसायिक शेतकरी, तलाठी यांचा समावेश राहील. 

 

या योजनांचा नियमितपणे आढावा घेऊन योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रभावीपणे कार्यवाही होईल. पीक उत्पादन आराखडा निश्चित झाल्यानंतर लागणाऱ्या निविष्ठा जसे बियाणे, खते, पीक संरक्षण औषधे यांच्या उपलब्धतेबाबत नियोजन करण्यात येईल. 
-संभाजी ठाकूर, 
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Establishment of a committee at the Gram Panchayat level to promote agribusiness in rural areas