
विद्यार्थ्यांना वार्षिक दोन लाख चाळीस हजार रुपयांचे पॅकेज पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षापासून तीन लाख रुपयांचे पॅकेज कंपनीकडून देण्यात येणार आहे.
जळगाव : कोविड-१९च्या आपत्ती काळातही कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील केमिकल टेक्नॉलॉजीच्या ७ विद्यार्थ्यांची गुजरात राज्यातील दहेज येथील नोसिल लिमिटेड कंपनीमध्ये ऑनलाईन मुलाखतीव्दारे निवड करण्यात आली. विद्यार्थ्यांना सरासरी अडीच लाखांपर्यंतचे पॅकेजही मिळाले आहे.
आवश्य वाचा- शहरातील रस्ते दुरुस्तीचा कोट्यवधींचा खर्च गेल्या खड्ड्यात
विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी संस्थेत गेल्या २५ वर्षांपासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. या संस्थेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना परिसर मुलाखतीव्दारे नोकरीची नामांकित कंपनीमध्ये संधी मिळाली आहे. सद्य:स्थितीत कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता परिसर मुलाखतीचे आयोजन होऊ शकत नसल्याने विद्यापीठाच्या सेंट्रल ट्रेनिंग ॲण्ड प्लेसमेंट कक्षाच्या विनंतीवरून नोसिल लिमिटेड कंपनीचे प्रतिनिधी, सहायक व्यवस्थापक श्रीराम कुलकर्णी आणि मनुष्यबळ व्यवस्थापक सुमित हैबत यांनी ऑनलाईन मुलाखतींचे आयोजन केले होते.
या मुलाखतींमधून केमिकल टेक्नॉलॉजीचे कुणाल भुत्ते, राजू मालेकर, भावेश जाधव, हर्षल पाटील, अमोल राठोड, मनीष मून आणि शंतनु पाटील या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांना वार्षिक दोन लाख चाळीस हजार रुपयांचे पॅकेज पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षापासून तीन लाख रुपयांचे पॅकेज कंपनीकडून देण्यात येणार आहे. एकूण २३ विद्यार्थ्यांनी या मुलाखतीमध्ये सहभाग नोंदविला होता. या मुलाखतीचे सूत्रसंचालन समन्वयक डॉ. उज्वल पाटील आणि राजकुमार शिरसाम यांनी केले. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, प्रभारी कुलसचिव प्रा.बी.व्ही.पवार, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, आणि संस्थेचे संचालक प्रा.जे.बी.नाईक यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे