बीएचआर’च्या गटारात सारे हात माखलेले ! 

सचिन जोशी | Monday, 7 December 2020

राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाईचंद हिराचंद (बीएचआर) पतसंस्थेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी सुरू केली. चौकशीमुळे नव्हे तर त्यात जी नावे समोर आली.

जळगाव ः बीएचआर प्रकरणात समोर येणाऱ्या नावांचा शहरात स्वच्छता करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीशी असलेला संबंध समोर आल्यानंतर सध्या समोर आलेली तथ्ये केवळ हिमनगाचे एक टोक असल्याचे दिसून येते. लाखांवर ठेवीदारांनाच नव्हे तर वॉटरग्रेसमुळे आता साडेपाच लाख जळगावकरांनाही वेठीस धरणारे हे प्रकरण आहे. ७० कोटी खर्चूनही शहरात स्वच्छतेची वाट लागत असेल आणि एवढे होऊनही सत्ताधारी-विरोधी सदस्य मूग गिळून असतील तर ‘बीएचआर’च्या गटारात साऱ्यांचेच हात माखलेले आहेत, हे अधोरेखित होणेही स्वाभाविक म्हणावे लागेल. 

वाचा- ‘अमृत’च्या विषाची परीक्षा; एकेका रस्त्यावर चारवेळा चालतेय ‘जेसीबी’ 

आठवडाभरापूर्वी राज्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने भाईचंद हिराचंद (बीएचआर) पतसंस्थेतील कथित गैरव्यवहारप्रकरणी चौकशी सुरू केली. चौकशीमुळे नव्हे तर त्यात जी नावे समोर आली, त्यांच्यामुळे मात्र या प्रकरणी राजकीय, सहकार क्षेत्रात खळबळ उडणे स्वाभाविक होते. आतापर्यंत नियमबाह्य, असुरक्षित कर्जवाटप, ठेवींचा गैरवापर एवढ्यापुरते या प्रकरणाकडे पाहिले जात होते. मात्र, नव्याने सुरू असलेल्या चौकशीत सुनील झंवर, विवेक ठाकरेंसह काही सीए आणि अन्य बड्या लोकांची नावे समोर आल्यानंतर हे प्रकरण ठेवीदारांना देशोधडीला लावण्यापुरते मर्यादित नाही, तर त्यातून साडेपाच लाख जळगावकरांच्या जिवाशीही खेळ करण्यापर्यंत प्रकरणाचे धागेदोरे पोचत आहेत. 

Advertising
Advertising

त्याला कारण या प्रकरणातील संशयित सुनील झंवर यांच्या कार्यालयात सापडलेली वॉटरग्रेसशी संबंधित कागदपत्रे. नाशिक, धुळ्यासोबतच जळगावलाही स्वच्छतेचा ठेका या कंपनीकडे तब्बल ७० कोटींत दिलाय. म्हणजे १९ वॉर्ड, ५४ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या शहराच्या स्वच्छतेवर महिन्याला सुमारे सहा कोटींचा खर्च होतो. त्या तुलनेत स्वच्छता होते का? तर त्याचे उत्तर ‘मुळीच नाही’ एवढ्या दोन शब्दांत बिनदिक्कतपणे दिले जाऊ शकते. 

महापालिकेत भाजपची पूर्ण बहुमताची सत्ता आहे. वर्षभरात शहराचा कायापालट करण्याच्या वल्गनेत भाजपने हा कारभार हाती घेतला. आता दोन-अडीच वर्षे उलटली, कायापालट झाला मात्र.. उलटाच आणि या उलट्या कायापालटात शहरातील स्वच्छता, रस्ते, उद्याने, आरोग्य या सर्वच बाबी प्रभावित झाल्या. त्यातही ज्या कामावर वर्षाला ७० कोटींचा खर्च होतोय, त्या स्वच्छतेची तर वाटच लागली. 

खरेतर ‘वॉटरग्रेस’चा ठेका दिल्यापासूनच तो वादात होता. ठेका तांत्रिकदृष्ट्या ‘वॉटरग्रेस’कडे दिला असला, तरी त्यामागे स्थानिकांचा सहभाग असल्याचेच बोलले जात होते. या विषयावरून विरोधी शिवसेना सदस्यांनी सभा, माध्यमांमधून बरेच रान उठविले. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांनी ‘वॉटरग्रेस’कडून नगरसेवकांना ‘पाकिटे’ जात असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्र्यांकडेही चौकशीची मागणी केली. अशातच ‘बीएचआर’चे नवे चौकशी प्रकरण समोर आले आणि त्यातील संशयित सुनील झंवर यांच्या कार्यालयात सापडलेली कागदपत्रे वॉटरग्रेसशी संबंधित असल्याचे पुढे आल्यानंतर शहराची ‘स्वच्छता’ कशी होतेय, हेदेखील अधोरेखित होते.

आवर्जून वाचा- सागर पार्क’ लाटण्यासाठी शंभर कोटींची सुपारी! -
 

. जळगावकरांचे दुर्दैव असे, की ‘वॉटरग्रेस’वरून रान उठविणारे विरोधकही आता मूग गिळून आहेत. सत्ताधाऱ्यांचा तर प्रश्‍नच नाही. हे सर्व प्रकरण बघता ‘बीएचआर’चा पैसा जसा संचालक, कर्जदार आणि मालमत्ता खरेदीदारांनी वापरून ठेवीदारांना देशोधडीला लावले तसेच कररूपातून मिळणारा पैसाही नागरी सुविधांवर खर्च न करता स्वत:साठी वापर करणाऱ्या महापालिकेतील सत्ताधारी-विरोधक, त्यांच्या नेत्यांनी साडेपाच लाख जळगावकरांना देशोधडीला लावलेय... काही मोजकी नावे ‘बीएचआर’मध्ये समोर आली असली तरी त्या नावांचा संबंध सर्वपक्षीय लोकांशी असल्याने साऱ्यांचेच हात या गटारांत माखलेले आहेत, असेच म्हणावे लागेल.
 

संपादन- भूषण श्रीखंडे