बचतगटांच्या नावाखाली तेरा महिलांना लावला लाखाेचा चुना

रईस शेख | Friday, 27 November 2020

 

जळगाव : बचतगटांच्या नावाखाली १३ जणांना साडेतेरा लाखांत गंडविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २६) सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संगीता नीरज जोशी, नीरज जोशी, जागृती नीरज जोशी, अशोक जयनारायण शर्मा, संतोष जयनारायण शर्मा, संजय जयनारायण शर्मा (सर्व रा. सांगवी, ता. शिरपूर, धुळे) अशी संशयितांची नावे आहेत. 

आवश्य वाचा-  २६/११ हल्यातील हिंगोण्याचे शहीद जवानाचा राजकीय पदधिकारींना पडला विसर

 

Advertising
Advertising

वत्सला पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता जोशी हिने जुलै २०१९ मध्ये पाटील यांच्या सून कामिनी यांच्याकडून १५ हजार रुपये मेडिकल साहित्य खरेदीसाठी घेतले होते. यानंतर लागलीच वत्सला पाटील यांच्याकडून ५० हजार रुपये घेतले. हे पैसे देण्यासाठी वत्सला पाटील यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवले होते. पैसे परत करण्यासाठी संगीता जोशी यांनी त्यांना ५० व ४० हजार रुपये दोन धनादेश दिले होते. पैसे परत करण्याची हमी शर्मा यांनी घेतली होती. आमच्याकडे पेट्रोलपंप आहे, भरपूर प्रॉपर्टी आहे, त्यामुळे चिंता करू नका, पैसे परत मिळतील, असे शर्मा यांनी वत्सला पाटील यांना हमी देताना सांगितले होते. 

पैसे घेऊन जोशी कुटुंबीय पसार 
परंतु हे पैसे परत देण्यापूर्वीच जोशी कुटुंबीय घर सोडून निघून गेले. यानंतर पाटील यांनी चौकशी केली असता जोशी कुटुंबीयांनी त्यांच्या कॉलनीत लघुउद्योग सुरू करण्याच्या नावाने अनेकांकडून पैसे घेतले होते. १३ जणांकडून १३ लाख ५० हजार २५० रुपये घेऊन जोशी कुटुंबीयांनी पोबारा केला आहे. या प्रकरणी गुरुवारी वत्सला पाटील यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

आवश्य वाचा- खानदेशात आजपासून उडणार लग्नाचे बार 
 

या महिलांची कर्ज घेऊन फसवणूक 
वत्सला रमेश पाटील, कामिनी रामकृष्ण पाटील, संध्या दिलीप घोडेस्वार, मथुराबाई भरतसिंग भोपाळवध, कल्पना विजय नात, सुवर्णा भूपेंद्र वानखेडे, विजया भास्कर वानखेडे, समीर पठाण, रोशन शब्बीर खान, युनूस खान पठाण, सीमा चंद्रकांत सोनवणे, सायराबी शाकीर खान पठाण, रोशनबी शब्बीर खान यांना विविध बँक, पतपेढी व बचतगटांच्या माध्यमातून लघुउद्योग सुरू करण्याबाबत व पैशांची वेगवेगळी आमिषे दाखविली. बचतगट स्थापन करून वेगवेगळ्या महिलांच्या नावे कर्ज पास करून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे