esakal | शेतकऱ्यांच्या आंदोलनात गिरीश महाजन विरोधक म्हणूनच शोभतात..! 
sakal

बोलून बातमी शोधा

girish mahajan

कापसाला मिळणारा हमीभाव ही एक समस्या आहे. कापसाला हमीभाव मिळवून देण्याबाबतचा तोडगा आजपर्यंत कोणत्याही सरकारला शोधता आलेला नाही.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात गिरीश महाजन विरोधक म्हणूनच शोभतात..! 

sakal_logo
By
राजेश सोनवणे

जळगाव : केळी पीक विम्यातील घोळ आणि शेतकऱ्यांच्या प्रश्‍नी भाजपनेते माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज राज्य सरकारविरोधात आंदोलन छेडले. चांगले आहे, महाजनांना शेतकऱ्यांचा कळवळा आला, कारण.. ते विरोधात आहेत. विरोधक म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी कापसाला ७ हजारांच्या दरासाठी आठ दिवस उपोषण केले होते.. याचीही आठवण आज ताजी झाली.. पण, महाजन आंदोलन करताना विरोधक म्हणून शोभतात, कारण सत्तेत असताना त्यांनी ना कापसाला भाव मिळवून दिला.. ना शेतकरी हिताचे काही निर्णय घेतले, अशी चर्चा सुरु झालीय. 

केळी पिक विमा योजनेचे निकष त्वरीत बदलावेत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत द्यावी, कापूस खरेदी केंद्रे त्वरीत सुरू करावी; यासारख्या मागण्यांसाठी भाजपने किसान मोर्चा काढला. भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्‍वात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान मोर्चा काढण्यात आला. गिरीश महाजन यांच्यासह खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी ठिय्या मांडला होता. हे आंदोलन पाहिल्‍यानंतर गिरीश महाजनांनी कापसाला सात हजार रूपये हमी भाव मिळावा; या मागणीसाठीही बेमुदत उपोषण केल्याच्या स्मृती ताज्या झाल्यात. 

महाजन आणि सात हजारांचा भाव 
कापसाला मिळणारा हमीभाव ही एक समस्या आहे. कापसाला हमीभाव मिळवून देण्याबाबतचा तोडगा आजपर्यंत कोणत्याही सरकारला शोधता आलेला नाही. संकटमोचक गिरीश महाजनांनी कापसाला सात हजार रुपये भाव मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २०११ मध्ये नऊ दिवस उपोषण केले. त्यावेळी भाजपनेते गोपीनाथ मुंडे जळगावी आले व त्यांनी त्यांच्या हातून महाजनांचे उपोषण सोडविले होते.. सागरपार्कवर त्यावेळी दणकेबाज सभाही झाली होती. पण, सत्तेत आल्यानंतर महाजन आंदोलनही विसरले होते; आणि सात हजारांच्या भाव मिळवून देण्याची मागणीही ते विसरले होते. 

आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी रस्‍त्‍यावर 
पाच वर्ष सत्‍तेत राहिल्‍यानंतर गिरीश महाजन यांनी कापसाला हमी भाव मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला नाही. विशेष म्‍हणजे कधी नव्हे तो शेतकरी संपावर उतरला तो भाजप सत्‍तेत असतानाच. राज्‍यातील भाजपची सत्‍ता गेली आणि गिरीश महाजन यांना पुन्हा शेतकरी आणि त्‍यांच्या मालाला भाव आठवू लागला. यामुळेच शेतकऱ्यांसाठी गिरीश महाजन आज पुन्हा रस्‍त्‍यावर उतरले आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळवून देण्याची मागणी करत आहेत. अर्थात विरोधात बसल्‍यानंतरच महाजनांना शेतकऱ्यांची आठवण येते, असेही यानिमित्ताने बोलले जाऊ लागलेय.

loading image
go to top