सोने-चांदीत विक्रमी वाढ….सोन्याला ५४ हजार ७०० दराचा मुलामा ! 

सचिन जोशी
Tuesday, 28 July 2020

कोरोनाच्या संकटात विदेशातील बँकांनी व्याजदरात केलेली कपातीमुळे सोने चांदीच्या गुतंवणीचा कल वाढला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ आहे.

जळगाव : गेल्या चार महिन्यांपासून सोने- चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. दरम्यानचे काही दिवस सोडले तर ही दरवाढ सातत्यपूर्ण आहे. अवघ्या पाच महिन्यांत सोन्याच्या दरात प्रतितोळा सात हजारांची वाढ झाली असून चांदीतही आठ हजार रुपये भाववाढ झाली आहे. मंगळवारी तर सोने ५४ हजार ७०० रुपये तर चांदी ६७ हजाराचा दराचा नवा उच्चांक गाठला.

गेल्या चार महिन्यापासून कोरोना मुळे संपूर्ण अर्थव्यवस्थाच बदली यात सुवर्ण व्यवसायावर देखील मोठा फरक पडला. परंतू या कोरोनाच्या संकटात विदेशातील बँकांनी व्याजदरात केलेली कपातीमुळे सोने चांदीच्या गुतंवणीचा कल वाढला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ आहे असून मंगळवारी नवा उच्चांक गाठला. सोन्याच्या दरात विक्रमी दीड हजारांची वाढ झाली, तर चांदीही तीन हजारांनी महागली. देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सुवर्णबाजारात सोने प्रतितोळा ५४ हजार ५००वर पोचले तर चांदीनेही ‘भाव’ खात ६७ हजारांचा टप्पा गाठला. 

आठवडाभरातील दर (जळगाव बाजार, जीएसटीसह) 
तारीख-------सोने (१०ग्रॅम)---- चांदी (प्रतिकिलो) 
१९ जुलै------५१७००------५३७५० 
२० जुलै------५१६९०-------५३७६० 
२१ जुलै ------५१६९५-------५४७५५ 
२२ जुलै------५१७००-------६२२०० 
२४ जुलै------५१७५०-------६२१५० 
२५ जुलै------५३३००------६३००० 
२७ जुलै-----५३५००-------६३०५० 
२८ जुलै------५४७००-----६६७०० 

मुख्य शहरांतील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 
जळगाव : ५४७०० 
मुंबई : ५२९०० 
दिल्ली : ५४६०० 
कोलकाता : ५४६०० 

जागतिक बँकेसह अन्य बँकांनी ठेवींच्या व्याजदरात कपात केल्याने सोन्यामधील गुंतवणूक वाढतेय. दुसरीकडे चीन- अमेरिकेतील व्यापारयुद्ध, अर्थव्यवस्थेतील अस्थिरता हीदेखील कारणे या दरवाढीमागे आहेत. आणखी एक- दोन महिने अशीच स्थिती राहील. सोने ५५ हजारांच्या वर व चांदी ७० हजारांचा टप्पा येत्या आठ-दहा दिवसांत गाठेल. 
- अजय ललवाणी (अध्यक्ष, सुवर्ण व्यावसायिक संघटना, जळगाव) 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Gold- Silver prices Record growth and rate hike is consistent