राज्यपालांनी खडसेंना दिल्या यशाच्या सदिच्छा 

सचिन जोशी | Wednesday, 25 November 2020

मी आपले हार्दिक अभिनंदन करतो व आपणांस सुयश चिंतितो. लेखक डॉ. सुनील नेवे यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करून लिहिलेला हा ग्रंथ संग्रहणीय झाला आहे,

जळगाव : राज्य सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी शिफारस करून पाठविलेल्या एकनाथ खडसे यांसह अन्य नावांच्या यादीला राज्यपाल मंजुरी देता की नाही, याबाबत साशंकता असताना राज्यपालांनी खडसे यांच्या विधानसभेतील योगदान व समाजसेवेबद्दल कौतुक करत यशाच्या सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. 

हेही वाचा- बांधकाम क्षेत्राला संजीवनी देणारा निर्णय 

अर्थात, त्यासाठी निमित्त ठरले प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी लिहिलेले ‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ हे पुस्तक. प्रा. नेवे यांनी खडसेंच्या एकूणच कार्यपद्धती, जनसंपर्क, त्यांची वक्तृत्वशैली, केलेली विकासकामे यावर संशोधन करून त्यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारे पुस्तक लिहिले आहे. सप्टेंबरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, रावसाहेब दानवे, हरिभाऊ बागडे आदी प्रभूतींच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. 

Advertising
Advertising

राज्यपालांना पाठविले पुस्तक 
खडसेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पुस्तकाची प्रत अवलोकनार्थ पाठविली होती. श्री. कोश्‍यारी यांनी या पुस्तकावर तातडीने आपला अभिप्राय लिहून पाठविला आहे. या अभिप्रायातून कोश्‍यारी यांनी खडसेंच्या राजकीय, सामाजिक व सांसदीय कारकीर्दीचे कौतुक केले आहे. 

राज्यपालांचा अभिप्राय असा 
‘पुस्तकाच्या माध्यमातून आपले व्यक्तिमत्त्व, समाजकारण, राजकारण, सांसदीय कार्य, वैचारिक भूमिका, तसेच विधानसभा सदस्य म्हणून योगदान यांसह आपल्या व्यापक सेवाकार्याचा अभ्यासपूर्ण आलेख मांडला आहे. यानिमित्त मी आपले हार्दिक अभिनंदन करतो व आपणांस सुयश चिंतितो. लेखक डॉ. सुनील नेवे यांनी अभ्यासपूर्ण संशोधन करून लिहिलेला हा ग्रंथ संग्रहणीय झाला आहे, त्याबद्दल त्यांचेदेखील मी अभिनंदन करतो.’ 
 

 

संपादन- भूषण श्रीखंडे