हा भार सोसेना...शिक्षण विभाग आलाय "सलाइन'वर 

Head of Center vacancy state
Head of Center vacancy state

अमळनेर : कोरोनाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला असून, शिक्षण विभागही त्याला अपवाद नाही. संपूर्ण राज्यात केंद्रप्रमुखांची चार हजार 695 पदे मंजूर आहेत. यांपैकी दोन हजार 482 केंद्रप्रमुख कार्यरत असून, दोन हजार 205 पदे रिक्त आहेत. सुमारे 47 टक्के अर्थात निम्म्या केंद्रप्रमुखांच्या जागा रिक्त असल्यामुळे अनेक ठिकाणी "प्रभारीराज' सुरू आहे. त्यामुळे शिक्षण विभाग कोरोना काळात "सलाइन'वर असल्याचे दिसून येत आहे. 
काही जिल्ह्यांत केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचे प्रमाण जास्त असल्यामुळे एका केंद्रप्रमुखाकडे दोन ते तीन केंद्रांचा अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. परिणामी, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. "कोरोना'च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे अनेक शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा फंडा सुरू झाला आहे. या सर्व गोष्टींचे पर्यवेक्षण करण्यासाठी केंद्रप्रमुख महत्त्वाचा घटक आहे. 

शासन निर्णयांमध्ये बदल 
पूर्वी केंद्रप्रमुखांची पदे सेवेत असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या संवर्गाच्या सेवाज्येष्ठतेनुसार 100 टक्के पदोन्नतीने भरण्यात येत होती. मात्र, त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या 2 फेब्रुवारी 2010 च्या शासन निर्णयानुसार यात बदल करण्यात आला. या निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची 40 टक्के पदे सरळसेवेने, 30 टक्के पदोन्नतीने, तर उर्वरित 30 टक्के पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षांद्वारे भरण्याबाबतचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील 10 जून 2014 च्या अधिसूचनेद्वारे जिल्हा परिषदेकडून जिल्हा सेवाप्रवेश नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली. 

सरळसेवेची कार्यवाही नाहीच 
दरम्यानच्या काळात केंद्रप्रमुखांची सरळसेवेची 40 टक्के पदे व मर्यादित विभागीय परीक्षेची 20 टक्के पदे भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही झाली नाही. त्यामुळे ग्रामविकास व जलसंधारण विभागाकडील 21 फेब्रुवारी 2015 च्या पत्रान्वये केंद्रप्रमुखांची पदे भरण्यासाठी नियमित उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अभावितपणे पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्यांकरिता व पुन्हा एक दिवसाचा खंड देऊन पुढील 11 महिन्यांकरिता त्याच ठिकाणी नेमणूक देण्याबाबत सुचविण्यात आले होते. त्यानुसार अनेक जिल्हा परिषदांनी त्यांच्या स्तरावर ही कार्यवाही केली आहे. 

तात्पुरत्या स्वरूपात पदे भरण्याचा प्रस्ताव 
बिंदुनामावली व सेवा प्रवेश नियमातील काही अडचणींमुळे तसेच कोरोनाच्या संसर्गामुळेही बराच कालावधी जाऊ शकतो. तोपर्यंत ही पदे जिल्हास्तरावर "अभावित'पणे पदोन्नतीने पूर्णतः तात्पुरत्या स्वरूपात भरण्याबाबत परवानगी मिळावी, याबाबत प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांना तसा प्रस्तावही दिला आहे. 

केंद्रप्रमुख रिक्त पदे (टॉप पाच जिल्हे) 
जिल्हा............टक्के...........एकूण जागा........रिक्त जागा 
कोल्हापूर........76.02.........171.............130 
नागपूर...........73.53..........136.............100 
सोलापूर.........69.85..........199.............139 
हिंगोली...........66.18.........68...............45 
गोंदिया............62.35..........85.............53 
 
उत्तर महाराष्ट्र 
जिल्हा...........टक्के.........एकूण जागा..........रिक्त जागा 
नाशिक..........43.13........244..............115 
जळगाव.........42.12.........164..............74 
धुळे..............42.33.........60................26 
नंदुरबार..........18.28.........93................17 
नगर................51.22........246.............126 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com