महामार्ग चौपदरीकरण याच वर्षात...40 टक्के काम पूर्ण

fourway
fourway

जळगाव : वर्षभरापासून सुरू झालेले शहरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम लॉकडाउनच्या काळातही प्रगतिपथावर आहे. तीन पथकांद्वारे सध्या कामाला गती देण्यात आली असून, आतापर्यंत 40 टक्‍क्‍यांपर्यंत काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम येत्या वर्षातच पूर्ण करण्याचे लक्ष्य असून, हे काम पूर्ण झाल्यानंतर शहरवासीयांचा महामार्गावरील धोकादायक प्रवास टळणार आहे. या मार्गावर शिवकॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलाच्या नव्या कामाचा प्रस्तावही पाठविण्यात आला असून, त्याला मंजुरीची प्रतीक्षा आहे. 
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्ग चौपदरीकरणाचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या महामार्गाच्या दुतर्फा शहरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली. जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाढल्याने महामार्गावरून वाहतूकही प्रचंड वाढली. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढून निष्पापांचे बळी जात होते. त्यामुळे या कामासाठी जवळपास पंधरा वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. महामार्ग क्रमांक सहा जळगाव शहराबाहेरून बायपास गेल्याने शहरातील महामार्गाच्या अस्त्विवाचा प्रश्‍न निर्माण झाला. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी विशेष बाब म्हणून या कामाला मंजुरी दिली. निविदाप्रक्रिया आटोपून गेल्या वर्षी हे काम सुरू झाले. 

आठ किलोमीटरचा टप्पा 
जळगाव शहरात आहुजानगरपासून कालिकामाता चौकापर्यंतच्या आठ किलोमीटर टप्प्याचे काम यात होणार आहे. त्यासाठी 61 कोटी 85 लाखांची जांडू कन्स्ट्रक्‍शनची निविदा मंजूर होऊन काम देण्यात आले आहे. वर्षभरात काम पूर्ण करण्याची मुदत असताना ते पूर्ण होऊ शकले नाही. त्यातच मार्चपासून लॉकडाउन सुरू झाल्याने काम ठप्प झाले होते. आता पुन्हा एकदा या कामाला सुरवात झाली आहे. 

तीन पथकांद्वारे काम 
सध्या प्रत्येकी 12 ते 15 कामगारांची तीन पथके या कामासाठी नियुक्त करण्यात आली आहेत. या कामात महामार्गाच्या धर्तीवर तेवढे रुंद चौपदरीकरण होणार नसले तरी 30 मीटरपर्यंतचे रुंदीकरण दोन्ही बाजूंनी होईल. आतापर्यंत 40 टक्के काम पूर्ण झाले आहे. लॉकडाउनच्या अडचणींमुळे कामाला मुदतवाढ देण्यात आली असून, मार्च 2021 पर्यंत या कामाची मुदत आहे. तरीदेखील या वर्षाच्या आतच काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे, असे मक्तेदार एजन्सीच्या प्रतिनिधीकडून सांगण्यात आले. 


शिवकॉलनी उड्डाणपुलाचा प्रस्ताव 
महामार्गावर शिवकॉलनीजवळ रेल्वे उड्डाणपूल आहे. त्याची अवस्था बिकट असून, त्याठिकाणी चौपदरीकरणात नवा पूल बांधण्याचा 30 कोटी खर्चाचा प्रस्ताव महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, त्याच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. 


शहरातील महामार्ग दृष्टिक्षेप 
महामार्गाचा टप्पा : आहुजानगर ते कालिंकामाता मंदिर चौक 
एकूण अंतर : आठ किलोमीटर 
कामावरील खर्च : 61 कोटी 86 लाख 
टप्प्यातील भुयारी मार्ग : 04 
रोटरी सर्कल : 03 
कामाची मुदत : मार्च 2021 पर्यंत 
आतापर्यंत झालेले काम : 40 टक्के 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com