असेच सुरू राहणार तर मार्चपर्यंत कसे होणार; महामार्गाचे चौपदरीकरण

सचिन जोशी
Saturday, 21 November 2020

महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात फागणे-तरसोद हा टप्पा पाळधीपासून बायपास निघून तरसोदपर्यंत जात असल्याने पाळधी ते तरसोद या जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता;

जळगाव : महामार्ग क्रमांक सहाच्या जळगाव शहरातील साडेसात किलोमीटर टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम दीड वर्षापासून सुरू असले तरी सध्याची कामाची संथगती बघता ते मुदतीत पूर्ण होणार की नाही, याबाबत साशंकता आहे. आतापर्यंत ६० टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा मक्तेदार एजन्सीने केला असला तरी अद्याप बरेचसे काम बाकी आहे. 
महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाच्या कामात फागणे-तरसोद हा टप्पा पाळधीपासून बायपास निघून तरसोदपर्यंत जात असल्याने पाळधी ते तरसोद या जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्‍न निर्माण झाला होता; परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शहरातील कामासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी देत ७० कोटींचा निधीही दिला. त्यानुसार निविदा प्रक्रिया होऊन जांडू कन्स्ट्रक्शनला या कामाचा मक्ता देण्यात आला. 

वर्षभरापासून काम सुरू 
गेल्या वर्षी २०१९ मध्ये काम सुरू झाले. या कामात खोटेनगरपासून कालिकामाता मंदिरापर्यंतच्या साडेसात किलोमीटर टप्प्यातील मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. ६९ कोटी खर्चाच्या या कामात दोन उड्डाणपूल, दोन रोटरी सर्कल, चार ठिकाणी अंडरपास अशा कामांचा समावेश आहे. पैकी खोटेनगर ते मानराज पार्क व आयटीआय ते आकाशवाणी चौक अशा दोन ठिकाणी उड्डाणपुलाचे काम होत आहे. या पुलांना खालून दुतर्फा समांतर सेवारस्ते होतील. उर्वरित चौकांमध्ये रोटरी सर्कल, अंडरपासचे काम होईल. 

काम संथगतीने 
मक्तेदार एजन्सीच्या दाव्यानुसार सध्या एकूण कामाच्या ६० टक्के काम झाले आहे. अर्थात, त्यात उड्डाणपूल, अंडरपास, रोटरी सर्कल या मुख्यत्वे बांधकामाशी संबंधित (construction work) कामातील गती अद्याप थंड बस्त्यात आहे. खोटेनगर ते मानराज पार्क या उड्डाणपुलाचे काम बऱ्यापैकी सुरू आहे. आयटीआय ते आकाशवाणी चौक या टप्प्यातील उड्डाणपुलाचे काम अद्याप प्राथमिक स्तरावर आहे. 

रस्तेकामाची तीच स्थिती 
बहुतांश ठिकाणी दुभाजक टाकून दोन्ही बाजूच्या रस्त्याचे कामही अपूर्ण आहे. विविध टप्प्यांतील केवळ दोन-अडीच किलोमीटरच्या दोन्ही बाजूंचे काम झाल्याचे दिसते. त्यामुळे रस्त्यांचे हे प्रमुख कामही बऱ्याच अंशी प्रलंबित आहे. त्यातच कामाच्या दर्जाबाबत काही जणांनी तक्रारी केल्यानंतर या कामात सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे अपेक्षित आहे. 

मार्चपर्यंत पूर्ण कसे होणार? 
या कामाची मुदत मार्च २०२१ पर्यंत आहे. मात्र, अद्यापही ५० टक्क्यांपेक्षा अधिक काम बाकी असल्याने आता उर्वरित चार-पाच महिन्यांत हे काम पूर्ण कसे होणार, असा प्रश्‍न आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चार महिने लॉकडाउनमध्ये काम प्रभावित झाले. त्यामुळे या कामालाही अन्य इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामांप्रमाणेच तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. 
 
कोरोनामुळे लागू झालेल्या लॉकडाउनच्या काळात काम पूर्णपणे बंद होते. कामाला मुदतवाढ मिळाली असली तरी आम्ही दिलेल्या मुदतीत मार्च २०२१ पर्यंत काम पूर्ण करू. 
-भूपिंदर सिंग, प्रकल्प अभियंता, जांडू कन्स्ट्रक्शन 
 
शहरातील महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत आपण महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी सी. एम. सिन्हा व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यानंतर या कामात सुधारणा होणे गरजेचे असून, त्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. 
-डॉ. राधेश्‍याम चौधरी 

संपादन ः राजेश सोनवणे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon highway four way work in progress slow