रुग्णसंख्या वाढली तर, खानदेशात प्राणवायूची कमतरता भासणार  

रुग्णसंख्या वाढली तर, खानदेशात प्राणवायूची कमतरता भासणार  

 
जळगाव : खानदेशात दिवसेंदिवस संसर्ग वाढत असून कोरोना बाधितांच्या संख्या हाताबाहेर जात आहेत. अशा स्थितीत जळगावसह धुळे व नंदूरबार जिल्ह्यात पुरेसे ऑक्सिजन बेड व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांसाठी पुरेसा पुरवठा सध्यातरी होत आहे. जळगावात दोन कंपन्यांकडून ऑक्सिजन पुरवठा होत आहे. आणखी एका उत्पादक कंपनीने परवान्यासाठी अर्ज केला असून त्याची तपासणी करुन परवानगी देण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागातील सूत्रांनी सांगितले. 

जळगावसह धुळे व नंदूरबार जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जळगाव जिल्ह्यात तर दररोज सात-आठशे, हजाराच्या घरात रुग्णांची भर पडत आहे. धुळे जिल्ह्यातील स्थिती जळगावसारखी नसली तरी संसर्ग वेगाने वाढतोय. 

जळगावातील स्थिती 
जळगाव जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ३३ हजारांवर रुग्ण होते. त्यापैकी जवळपास ७६३ रुग्ण ऑक्सिजनवर तर २१५ आयसीयूत होते. जिल्ह्यात सध्या १९४७ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. त्या तुलनेत ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. सध्यातरी ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा पुरेसा होत आहे. एकट्या शासकीय महाविद्यालयील कोविड रुग्णालयात दररोज ११०० सिलिंडर लागत आहेत. 

तिसऱ्या कंपनीचे उत्पादन लवकरच 
जळगाव जिल्ह्यात दोन कंपन्या ऑक्सिजन उत्पादक म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडून हा साठा उपलब्ध होत आहे. तिसऱ्या कंपनीनेही उत्पादनासाठी परवान्याचा अर्ज केला असून त्या कंपनीची तपासणी दोन दिवसांत करण्यात येईल. सर्व निकष व पात्रतेच्या अटी पूर्ण असल्यास लगेच परवाना देऊन उत्पादन सुरु होऊ शकते. त्यामुळे या तीन कंपन्यांद्वारे ऑक्सिजन पुरवठा होऊ शकेल. 

धुळ्यातही पुरेसा साठा 
धुळे ः जिल्ह्यातील एकूण कोविड सेंटरमध्ये ८७८ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांची संख्या ५०० असून सद्य:स्थितीत पुरेसा पुरवठा होत आहे. लिक्विड स्वरुपातील ऑक्सीजनची कमतरता भासत असली तरी ऑक्सिजन मिळत नाही, अशी स्थिती कुठेही नाही, असे जिल्हाधिकारी संजय यादव यांनी स्पष्ट केले. 

व्यवस्था होणे गरजेचे 
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व कोविस सेंटरमिळून १२० ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध आहेत. सध्याचा रुग्णांची संख्या लक्षात घेता दररोज ६० ते ६५ ऑक्सीजन बेडचा वापर होत आहे. आजच्या स्थितीत वापरापेक्षा दुप्पट ऑक्सीजन क्षमता उपलब्ध आहे. मात्र वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता पुढे कमतरता भासू शकते. त्यासाठी अजून व्यवस्था होणे गरजेचे आहे असे निवासी आरोग्य अधिकारी डॉ. कांतराव सातपुते यांनी दिली. 

जिल्हा- आॅक्सीजन बेड- रूग्ण 
जळगाव ः१९४७ - ९७८ 
धुळे ः ८७८ - ५०० 
नंदुरबार ः १२० - ६५ 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com