नेतृत्व सिद्धीसह ‘शतप्रतिशत’ परंपरा राखण्याचे आव्हान !

सचिन जोशी
Wednesday, 28 October 2020

नेतृत्वही महाजनांकडेच होते. मात्र, तरीही खडसेंच्या सूचना वा हस्तक्षेपाची दखल घ्यावीच लागत होती. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व वाहताना काही कमी-जास्त झाले तर महाजनांकडून खडसेंची अडचण सांगितली जायची.

जळगाव ः एकनाथ खडसेंच्या भाजप त्याग व राष्ट्रवादी प्रवेशाने या दोन्ही पक्षांवर थेट परिणाम होणार आहेत. ते लगेचच दिसणारे नसले, तरी त्या परिणामांची प्रक्रिया सुरू झालीय, असे म्हणता येईल. खडसे असल्याने ‘अडचण’ हे कारण पुढे करणे आता चालणार नाही. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची सूत्रे केवळ हाती घेऊन चालणार नाही, तर गिरीश महाजनांसमोर सर्वव्यापी, सर्वमान्य नेतृत्व करताना जिल्ह्याची वर्षानुवर्षांची ‘शतप्रतिशत’ परंपरा कायम ठेवण्याचे आव्हानही आहेच. 

माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशातील नाट्याने गेल्या आठवडाभर जिल्ह्यातीलच नव्हे, तर उत्तर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले. ४० वर्षे भाजपत निष्ठेने सेवा केल्यानंतर हा पक्ष सोडण्याची खडसेंवर वेळ का यावी, या प्रश्‍नावर दीर्घकाळ कवित्व यापुढेही सुरू राहील. मात्र, खडसेंसाठी भाजप आता भूतकाळ झालाय तर राष्ट्रवादी हा त्यांचा वर्तमान आहे अन्‌ राष्ट्रवादीत नेमके कोणते पद त्यांना मिळते, हे त्यांचे भविष्य. त्यामुळे आता भूतकाळ झालेल्या भाजपबद्दल न बोलता खडसेंना त्यांचे भविष्यातील व्हीजन निश्‍चित करून त्यादृष्टीने वाटचाल करावी लागेल. 

भाजपसाठीही खडसे आता भूतकाळ झालेत. याआधी महाजन आणि खडसे हे पक्षांतर्गत दोन गट होते. खरेतर चार वर्षे (खडसेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर) पक्षाची धुरा व स्वाभाविकत: नेतृत्वही महाजनांकडेच होते. मात्र, तरीही खडसेंच्या सूचना वा हस्तक्षेपाची दखल घ्यावीच लागत होती. त्यामुळे पक्षाचे नेतृत्व वाहताना काही कमी-जास्त झाले तर महाजनांकडून खडसेंची अडचण सांगितली जायची. आता ते कारण देता येणार नाही. 
खडसेंच्या पक्षांतरानंतर संस्था म्हणून पाहिले, तर जिल्हा सहकारी बँक व दूध संघ या दोन्ही मोठ्या संस्था भाजपच्या हातून गेल्यात, ही वस्तुस्थिती आहे. पक्षांतर बंदीच्या कायद्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, त्यातील प्रतिनिधी लगेच राजीनामा देऊन खडसेंसोबत जाणे कठीण आहे. त्यामुळे खडसेंचे समर्थक शरीराने भाजपत, मनाने खडसेंसोबत असे करू शकतात. काही तर उघडपणे खडसेंची भेट घेत आहेत. त्यामुळेच आज भाजप प्रदेश संघटनमंत्र्यांच्या उपस्थितीतील बैठकीत त्यासंबंधी चाचपणी घेण्यात आली. संघटन आणि जळगाव महापालिकेसह जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपसाठी ‘शतप्रतिशत’ हे चित्र बैठकीत जरी दिसत असले तरी ते ‘व्हर्च्युअल’ म्हणजेच आभासी नाही, तर ‘ॲक्च्युअल’ म्हणजेच वास्तव आहे, हे महाजन आणि त्यांच्या टीम भाजपला सिद्ध करावे लागेल. अर्थातच, त्यासाठी प्रदेश भाजपची ताकद त्यांच्या पाठीशी असेलच. 

जिल्ह्यात महाजनांचे सर्वव्यापी नेतृत्व प्रस्थापित करतानाच भविष्यात बदलणाऱ्या समीकरणांवरही भाजपला काम करावे लागेल. विशेषत: रावेर लोकसभा क्षेत्रातील जामनेर वगळता भुसावळ, रावेर, मुक्ताईनगर, चोपडा व मलकापूर या पाचही मतदारसंघांवर लक्ष द्यावे लागणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळचे चित्र काहीही असो, या संपूर्ण क्षेत्रात खडसेंचा प्रभाव नाकारून चालणार नाही. जिल्ह्याच्या अमळनेर, पारोळा, चाळीसगाव आणि काही प्रमाणात जळगाव शहर व तालुका या भागातही खडसे ‘फॅक्टर’ आहे. हा प्रभाव निष्प्रभ केला तरच भाजपचे ‘केडर’ सिद्ध होऊ शकेल. भाजपचे नेतृत्व आणि ‘केडर’ हे आव्हान कसे पेलते? हे आगामी काळात दिसून येईल. 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Khadse joining the NCP, it will be a challenge for the BJP to prove its leadership in Jalgaon district