लाडली नावाचं गाव; येथील भेंडी फॉरेनचीही ‘लाडली’

राजेश सोनवणे
Sunday, 22 November 2020

गाव शिवारात कपाशी हे प्रमुख पीक असून, काही प्रमाणात केळीही आहे. रब्बीमध्ये मका, हरभरा, गहू घेतले जातात. मात्र, घरात खेळता पैसा येण्याच्या उद्देशाने गावातील दोन- तीन प्रयोगशील शेतकऱ्यांनी २००५ मध्ये भेंडी लागवडीचा प्रयोग केला.

जळगाव : जिल्हा कापसासाठी ओळखला जातो. यात लाडली (ता. धरणगाव) परिसरात कापूस हे प्रमुख पीक आहे. मात्र, या पारंपरिक पिकासोबतयेथे भेंडी पिकाची उत्तम शेती केली जात आहे. उत्पादित होणारी भेंडी निर्यातक्षम असून, वाशी (मुंबई), इंदौरपर्यंतच नाही; तर फॉरेनच्या मार्केटमध्येही ओळख मिळवली आहे. कापूस पट्ट्यात लाडलीने भेंडी पिकाची कास धरली असून, काढणीच्या हंगामात गावातून रोज किमान १५ ते २० मेट्रिक टन भेंडी बाजारात जाते.

गाव शिवारात कपाशी हे प्रमुख पीक असून, काही प्रमाणात केळीही आहे. रब्बीमध्ये मका, हरभरा, गहू घेतले जातात. मात्र, घरात खेळता पैसा येण्याच्या उद्देशाने गावातील दोन- तीन प्रयोगशील शेतकऱ्यांनी २००५ मध्ये भेंडी लागवडीचा प्रयोग केला. त्यात फायदा दिसून आल्याने कापसाचे क्षेत्र कमी करून भेंडी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला. भेंडी उत्पादकांची संख्या वाढत आज गावात शंभरहून अधिक शेतकरी भेंडी पीक घेतात. दरांमध्ये चढउतार असला तरी शेतकऱ्यांची एक ते पाच एकरपर्यंत भेंडी असते. गावाचे एकूण शिवार सुमारे २७३ हेक्‍टर असून, त्यातील दरवर्षी सुमारे १८० ते २०० एकर भेंडीखाली असते.

दूरवरून पाईपलाईन
गिरणा नदीकाठी वसलेल्या लाडली गावातील जमीन कुठे काळी कसदार तर कुठे हलकी व मध्यम खारट प्रकारची आहे. नदीकाठाकडील भागात जलसाठे मुबलक असून गावाच्या पश्‍चिम, दक्षिण भागात जलसाठे कमी आहेत. या भागातील अनेक शेतकऱ्यांनी दोन ते तीन कि.मी. एवढ्या अंतरावरून जलवाहिन्या टाकत सिंचनाची सुविधा केली आहे. ज्‍यांच्याकडे पाण्याची सुविधा नाही; असे लहान शेतकरी देखील विकत पाणी घेत भेंडीचे उत्‍पादन घेत आहेत.

रब्‍बी हंगामात अधिक लागवड
पावसाळ्यात म्हणजेच जुलै- ऑगस्टमध्ये भेंडीची लागवड केली जाते. पावसाळ्यातील भेंडीला सिंचनाची गरजही कमी असते. हलक्‍या, पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रात भेंडी अधिक असते. परंतु, रब्‍बीच्या हंगामात अधिक लागवड होत असते. सुमारे १५ ते २० शेतकरी पावसाळ्यात भेंडीला ठिबकची व्यवस्था करतात; तर उर्वरित शेतकरी पाट पद्धतीने सिंचन करतात. भेंडीकाढणी लागवडीनंतर ४५ दिवसांत सुरू होते. दर एक दिवसाआड काढणी केली जाते.

जागेवरच खरेदी
लाडलीच्या भेंडीची खरेदी जागेवरच किंवा शिवारात केली जाते. अनेक मध्यस्थांनी शेतकरी जोडून ठेवले आहेत. ते शेतकऱ्यांना निर्यातक्षम भेंडीसाठी बियाणे व कीडनाशकांचा पुरवठा करतात. काढणीनंतर त्याची रक्कम येणाऱ्या उत्पन्नातून कपात करतात. मध्यस्थ वाशी (मुंबई) येथील बाजारात पाच किलोच्या बॉक्‍समध्ये पॅकिंग करून भेंडीची निर्यात करतात. भेंडीची वाशी बाजारातील मोठे खरेदीदार आखातासह युरोपात निर्यात करतात. कोरोनामुळे सध्या परदेशातील भेंडीची निर्यात बंद आहे. तरी देखील गावातून रोज १० ते १५ मेट्रिक टन भेंडी रोज पॅकिंग होवून बाजारात जात आहे.

दोन रुपये प्रिमियम
लाडलीच्या भेंडीला पंचक्रोशीतील इतर गावांमधील भेंडीच्या तुलनेत दरवर्षी किलोमागे दोन रुपये अधिक दर मिळतो. त्याचे कारण म्हणजेच शेतातच प्रतवारी, चांगली हाताळणी, लांबलचक, चवदार, हिरवीगार, चमकदार भेंडीचे उत्पादन. २०१७ मध्ये प्रतिकिलो २० ते २८ रुपये, २०१८ मध्ये २५ ते ४० रुपये आणि २०१९ मध्येदेखील २४ ते ३५ रुपये प्रतिकिलो असे चांगले दर जागेवर मिळाले आहेत. यावर्षी देखील २० ते ३५ रूपयांपर्यंत भेंडीचे दर शेतकऱ्याला बांधावर मिळत आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ladli village transport okra vashi and forain market