टेक्‍स्टाइल पार्कचा पाच महिन्यांपासून बुडबुडाच ! 

textile park
textile park

भडगाव : केंद्राने देशात दहा ठिकाणी टेक्‍स्टाइल पार्क उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एक प्रकल्प हा महाराष्ट्रात होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात व्हावा, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्राकडे लावून धरली आहे. त्यासाठी राज्य शासनाची ना हरकत आणि तसा प्रस्ताव केंद्राकडे देणे आवश्‍यक आहे. मात्र, पाच महिने होत आले तरी यासंबंधी राज्य शासनाकडून हालचाल नसल्याने हा प्रश्‍न रेंगाळला असल्याचे चित्र आहे. याबाबत खासदारांनीही राज्य शासनाकडे बोट दाखविले आहे. हा प्रकल्प झाल्यास जिल्ह्यातील 25 हजार बेरोजगारांना काम मिळणार आहे. 
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रायलयाने टेक्‍स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा जानेवारीत केली होती. त्यातला एक प्रकल्प राज्यातही होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात व्हावा, अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केंद्राकडे लावून धरली आहे. या प्रकल्पासाठी लागणारी जमीन, वीज, रस्ते या सुविधा भडगाव तालुक्‍यात नगरदेवळा सूतगिरणी येथे मंजूर असलेल्या एमआयडीसीत उपलब्ध आहे. त्यामुळे राज्य शासनाने हे टेक्‍स्टाइल पार्क नगरदेवळा सूतगिरणीच्या ठिकाणी उभारण्यास शिफारस करावी, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा प्रकल्प जिल्ह्याच्या अन्‌ गिरणा पट्ट्याचा विकासाचा नवीन मापदंड ठरणार आहे. 

पाठपुराव्याची गरज 
केंद्राकडून उभारण्यात येणाऱ्या टेक्‍स्टाइल पार्कबाबत राज्य शासनाचा थंडपणा असल्याचे चित्र आहे. पाच महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ना हरकत व शिफारस देण्याबाबत पत्र देण्यात आले आहे. मात्र, राज्य शासनाकडून अद्यापर्यंत काहीएक हालचाल झाली नसल्याचे पाहावयास मिळत आहे. टेक्‍स्टाइल पार्क जिल्ह्यात विशेषतः गिरणा पट्ट्यात खेचून आणण्यासाठी राजकीय ताकद लागणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पक्षांचे जोड बाजूला सारून टेक्‍स्टाइल पार्क जिल्ह्यात खेचून आणण्यासाठी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. 

प्रकल्पामुळे 25 हजार जणांना रोजगार 
आमदार किशोर पाटील यांनी टेक्‍स्टाइल पार्कसाठी जी जागा सुचित केली आहे, ती नगरदेवळा जागा सर्वांगाने परिपूर्ण आहे. तसेच या प्रकल्पामुळे गिरणा पट्ट्यासह जिल्ह्यातील 25 हजार जणांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय टेक्‍स्टाइल इंडस्ट्रीजला आवश्‍यक असणार कच्चा माल जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. जिल्ह्यात सात लाख लागवडीयुक्त क्षेत्रांपैकी तब्बल पाच लाख हेक्‍टर क्षेत्रावर कापसाची लागवड केली जाते. साधारणपणे दर वर्षी एक कोटी क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पादन येते. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात समृद्धी नांदणार आहे. गिरणा पट्ट्याचा औद्योगिकदृष्ट्या विकासाचा अनुशेष भरून निघणार आहे. 

टेक्‍स्टाइल पार्क नगरदेवळा सूतगिरणीच्या परिसरात व्हावे, यासाठी केंद्राला शिफारस करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्याला ब्रेक लागला. मात्र लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रकल्पास केंद्राकडे शिफारस करण्याबाबत मागणी करू. 
-किशोर पाटील, आमदार पाचोरा- भडगाव 

प्रकल्पासाठी जमेच्या बाजू 
- एक हजार एकरपेक्षा अधिक जागा उपलब्ध 
- पाचशे मीटरवर 132 केव्ही वीज उपकेंद्र 
- जमिनीला लागूनच नगरदेवळा रेल्वेस्थानक 
- संबंधित जागेला लागूनच राष्ट्रीय महामार्ग 
- चार किलोमीटर अंतरावर गिरणा नदी 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com