मध्यरात्रीनंतर पावसाने झोडपले; शहरातील अनेक भागात पाणी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

खानदेशात दोन दिवसांपुर्वी मान्सुन दाखल झाला होता. खानदेशातील नंदुरबार, शहादा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शहादा तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

जळगाव : बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मान्सुनच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उन आणि उकाळा जाणवत असताना मध्यरात्रीनंतर पावसाने अक्षरशः झोडपून काढले. साधारण एक- दीड तास चाललेल्या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. 
खानदेशात दोन दिवसांपुर्वी मान्सुन दाखल झाला होता. खानदेशातील नंदुरबार, शहादा परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली होती. यामुळे शहादा तालुका परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर दुसऱ्या दिवशी जळगाव जिल्ह्यात मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे बहुतांश भागात पाणीच पाणी साचले होते. 

दीड तास जोरदार हजेरी 
ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार वर्षाव करून पावसाने आज रात्री एकच्या सुमारास हजेरी लावली. शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत मुसळधार पावसाने वातावरणात गारवा निर्माण केला. शहरातील काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत कमी-अधिक प्रमाणात पावसाची रिपरिप सुरूच होती. परंतु साधारण दीड तास जोरदार पाऊस झाला. सकाळी मात्र कडक ऊन पडले होते. 

पेरणीच्या कामांना वेग 
मान्सुनच्या पावसाची प्रतिक्षा बळीराजाला लागून होती. मान्सुनपुर्व शेतीची मशागतीचे काम देखील पुर्ण झाले होते. मध्यरात्री आलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून, पेरणीच्या कामांना आता वेग आला आहे. सकाळीच बळीराजा उडीद, मुग, कपाशी लागवडीसाठी शेतात जाताना दिसून येत होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon late night heavy rain