पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती सातपुड्यातील यावल अभयारण्यात सापडली !

पश्चिम घाटातील दुर्मिळ वनस्पती सातपुड्यातील यावल अभयारण्यात सापडली !

जळगाव ः यावल अभयारण्य व यावल प्रादेशिक क्षेत्रातील वने अनेक दुर्मिळ वनस्पतींनी संपन्न आहेत. सातपुड्यातील अशाच दुर्मिळ रानफुलांच्या अभ्यासासाठी भ्रमंती करत असताना एका उंच वृक्षावर पातळ काड्यांसारखी पाने असलेल्या एका आमरीवर वनस्पती अभ्यासक प्रसाद सोनवणे यांना दुर्मिळ अशी कारूण्यपुष्प आमरी (Luisia tristis) वनस्पती सापडली आहे.  

वनहक्क कायदा आल्या नंतर सातपुडा ओरबाडने प्रचंड प्रमाणात वाढले होते परंतु गेल्या 5 वर्षात वनविभागाचे अधिकारी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव श्रीसुनील लिमये, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नासिक अनिल अंजनकर, सहाय्यक उपवनसंरक्षक आश्विनी खोडपे, वनक्षेत्रपाल अक्षय म्हेत्रे व वनरक्षक टीम यावल वन्यजीव यांच्या अथक प्रयत्नातून जळगाव जिल्ह्यातील सातपुड्यास गत वैभव प्राप्त होत आहे. लुईझिया सारख्या दुर्मिळ वनस्पती ची नोंद नक्कीच भूषणावह असुन ही जंगलं सुदृढ़ असल्याचे ते लक्षण असल्याचे  वनस्पती अभ्यासक राहूल सोनवणे यांनी माहिती दिली. 

लुईझिया ट्रिस्टीस वनस्पतीचे असे वैशिष्ट

अभ्यासक सोनवणे यांनी केलेल्या संशोधनात कारूण्यपुष्प आमरी (Luisia tristis) ही वनस्पतीला काड्यांसारखी पाने व मुळे यांचा हिरवा गुंतावळा प्रथम दर्शनी लक्षातही येत नाही. वनस्पतीच्या मुळे व पाने यांचा पुंजका व खाली झुकलेल़्या फुलांच्या एकुणच स्वरुपामुळे तिचे मराठी नाव कारुण्यपुष्प आमरी. कारण या वनस्पतीची पाने सामान्य पानांसारखी नसुन पातळ काड्यांसारखी लांबट असतात. ही वनस्पती 600-800 मी उंचावरील आर्द्र व शुष्क पानझडी वनांमध्ये उंच झाडांवर वाढते. हीची फूले अत्यंत देखणी परंतु खुपच लहान( 5-7 मिमी) असतात. त्यामुळे फूले येवुन फलधारणा कधी झाली हे कळतही नाही.

अॉर्किड कुळातील ही वनस्पती

लुईझिया ट्रिस्टीस- ही वृक्षांवर वाढणारी अॉर्किड कुळातील वनस्पती असुन हीच्या काड्यांसारख्या लांबट पानांच्या कक्षांच्या विरुद्ध बाजुस 2-5 हिरवट फूले येतात. फुलाची खालची पाकळी (लिप) 3.5-5 मिमी, त्रिकोणी, ह्रदयाच्या आकाराची असुन गडद किरमीजी रंगाची किंवा त्यावर किरमीजी रंगाचे उभे पट्टे असतात. पुमंग व जायांग यांच्या संयोगातुन निर्माण झालेला आतल्या बाजुस वळलेला स्तंभ असतो. त्याच्या वरच्या भागात परागकणांच्या पुरचुंडींची जोडी असते. त्याच्या खाली स्त्री कोषाकडे नेणारा मार्ग असतो. अॉर्किड फुलांची अशी जटील रचना परागीभवन करणाऱ्या विशिष्ट किटकाला आकर्षित करण्यासाठीच असते.

पच्छिम घाटातील जंगलात सापडते वनस्पती

या वनस्पतीची खानदेशात पहिलीच नोंद झाली असून भिंगातुन पाहील्या खेरीज लुईझियाचे सौंदर्य लक्षात येत नाही, म्हणुनच या आमरी जंगलात टिकुन आहेत. ही वनस्पती पच्छिम घाटातील जंगलात सापडते. या वनस्पती विषयीचा त्यांचा लघुशोधनिबंध नुकताच "इला जर्नल अॉफ फॉरेस्ट्री अँड वाईल्डलाइफ" या विज्ञान पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. 
यासंशोधनात त्यांना डॉ. आर. जी.  खोसे व डॉ.  सुधाकर कुऱ्हाडे यांचे मार्गदर्शन व मयूरेश कुलकर्णी, सुशांत मोरे, चेतन भावसार, अमोल देशमुख,   बाळक्रुष्ण देवरे, अमन गुजर, भूषण चौधरी, रविंद्र सोनवणे, रविंद्र फालक, सतिष कांबळे, गौरव शिंदे यांचे सहकार्य लाभले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com