‘हा डीन आहे की डॉन...’ खुर्चीवर ताबा मिळवत टेबलावर पसरले पाय

देविदास वाणी
Sunday, 27 September 2020

सहयोगी प्रा. डॉ. डांगे यांनी खैरे यांच्या गैरहजेरीत थेट ‘मीच आता डीन, माझे सर्वांनी ऐका’, असे तब्बल तीन वेळा सहकाऱ्यांना सांगितले होते. ‘डीन’ यांच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलावर पायही ठेवले होते.

जळगाव : जिल्हा कोविड रुग्णालयात शरीरक्रीया शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी सलग चौथ्यांदा ‘डीन’च्या खुर्चीवर ताबा मिळविला. आता मीच ‘डीन’ असा आविर्भाव दाखवीत ‘डीन’च्या खुर्चीवर बसलेले आणि टेबलावर पाय टाकून बसून ‘मी सर्वांचा बॉस आहे’, असे सांगत आज सकाळी गोंधळ घातला. विशेष म्हणजे महाविद्यालयाचे डीन डॉ.जयप्रकाश रामानंद हे त्यांच्या कार्यालयात होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्याने तेही चक्रावून गेले. 

Image may contain: 1 person

डीन डॉ.रामानंद यांनी डॉ.डांगे यांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी समजून न घातल्याने डीन डॉ.रामानंद यांना जिल्हापेठ पोलिस ठाण्यात जावून डॉ. डांगे यांच्या विरूध्द तक्रार द्यावी लागली. त्यानंतर पोलिस जिल्हा कोविड रुग्णालयात आले. डॉ. डांगे यांना ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. याप्रकारामुळे वादग्रस्त डॉ. डांगे यांच्याबाबत तर्कवितर्क जिल्हा कोविड रुग्णालयात वर्तविले जात आहे. 

यापुर्वीही केला होता असा प्रकार
तत्कालीन अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांच्या कार्यकाळात सहयोगी प्रा. डॉ. डांगे यांनी खैरे यांच्या गैरहजेरीत थेट ‘मीच आता डीन, माझे सर्वांनी ऐका’, असे तब्बल तीन वेळा सहकाऱ्यांना सांगितले होते. ‘डीन’ यांच्या खुर्चीवर बसून समोरच्या टेबलावर पायही ठेवले होते. या गैरवर्तणुकीची आता चौकशी सुरू आहे. डॉ. डांगे यांच्या कारनाम्याबाबत आरोग्य संचालकांना पत्र पाठविण्यात आले होते. 

फाईल ओपन केली म्‍हणून...
नुकतीच ‘डीन’डॉ. रामानंद यांनी डॉ.डांगे यांची फाइल रिओपन केली होती. डॉ. डांगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईसाठी शरीरक्रीया शास्त्र विभागाच्या प्रमुखांकडून अहवाल मागविला आहे. तो आल्यानंतर डॉ. रामानंद त्यांचा अहवाल आरोग्य विभागाला सादर करतील. दरम्यान आज सकाळी पुन्हा डॉ.डांगे यांनी डीन यांच्या खूर्चीवर बसून गोंधळ टाकला. 

संपादनः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon medical collage dean chair seat proffecrer doctor