खडसे प्रवेशाचा विषय पवारांच्या ‘दरबारी’ 

सचिन जोशी
Wednesday, 23 September 2020

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येवून आढावा घेणार होते. मात्र आता पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्याने या बैठकीत काय निर्णय होतो.

जळगाव  : जिल्ह्यातील प्रश्‍नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत बुधवारी मुंबईत जिल्ह्यातील नेत्यांची बैठक आहे. यात भाजपनेते एकनाथराव खडसे यांच्या प्रवेशाबाबत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

जळगाव जिल्ह्यात संघटनात्मक आढावा तसेच माजी मंत्री व भाजपवर नाराज नेते एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत चाचपणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील बुधवारी जिल्ह्यात येणार होते. मात्र त्यांचा दौरा रद्द झाला आहे. त्याऐवजी शरद पवार हेच मुंबईत बैठक घेणार आहेत. पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांना मुंबईत बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे. सकाळी अकरा वाजता पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होणार आहे. 

जिल्ह्यातील प्रश्‍न अजेंड्यावर 
जिल्ह्यातील सिंचनाचे प्रलंबित प्रकल्प, केळीचे नुकसान व विम्यातील अडचणी आदी विषयावर बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. 

खडसेंच्या प्रवेशाबाबत चर्चा 
खडसेंनी यांनी गेल्या आठवड्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिला असा जाहीर आरोप त्यांनी केला होता. पक्षाने अन्याय केल्यामुळे त्यांनी पक्षात राहू नये असा सूरही त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ते शिवसेनेत जाणार की राष्ट्रवादीत जाणार या बाबत चर्चा सुरू झाली. शिवसेनानेते तथा राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही ते पक्षात आल्यास त्यांचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जळगाव जिल्ह्यात येवून आढावा घेणार होते. मात्र आता पक्षाचे नेते शरद पवारच आढावा घेत असल्याने या बैठकीत काय निर्णय होतो याकडे लक्ष असणार आहे. 

जिल्ह्याच्या नेत्यांना बुधवारी मुंबईत बोलावले असून जिल्ह्यातील काही प्रश्‍न, पक्षाची संघटनात्मक बांधणी याबाबत बैठकीत चर्चा होईल. खडसेंच्या पक्ष प्रवेशाबाबतही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 
- ॲड. रवींद्र पाटील (जिल्हाध्यक्ष) 

 

संपादन - भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Meeting with Sharad Pawar regarding Eknathrao Khadse's entry into NCP