केळी उत्पादक संकटात; करपा निर्मूलन कार्यक्रम पुन्हा राबवावा !

केळी उत्पादक संकटात; करपा निर्मूलन कार्यक्रम पुन्हा राबवावा !

जळगाव  :  जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर असून यंदा मात्र केळी उत्पादक विविध समस्यांमुळे संकटात सापडला आहेत. त्यावर उपाय म्हणून केंद्राने २०१२-१३ मध्ये सुरु केलेल्या केळी करपा निर्मूलन कार्यक्रम पुन्हा राबवावा अशी मागणी खासदार रक्षा खडसे यांनी आज लोकसभेत केली. 

लोकसभेत नियम १९३अन्वये देशातील कोविड १९ या महामारीवरील विषयावर आयोजित चर्चेत सहभागी होताना त्या बोलत होत्या. या विषयावर मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी सभापती ओम बिर्ला यांचे आभार मानले. 

केळी उत्पादक संकटात 
आपल्या निवेदनात खासदार रक्षा खडसे म्हणाल्या, रावेर लोकसभा क्षेत्रात जवळपास ८५ हजार हेक्टर जमिनीवर केळीची लागवड केली जाते. या केळीची संपूर्ण देशात विशेष ओळख आहे. कोरोनामुळे केळी पीक उत्पादक शेतकरी अडचणीत असताना लॉकडाउनमुळे वाहतूक बंद असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे केळी पीक अत्यल्प भावाने विकावे लागले. आणि त्यातच भर म्हणून नैसर्गिक संकट जसे वादळी वारा, पाऊस, गारपीट ला समोर जावे लागले. जास्त पावसामुळे कुकुंबर मोझेक व्हायरस चा सामना केळी पीक शेतकऱ्यांना करावा लागत आहे. 

‘करपा निर्मूलन’ पुन्हा सुरु करा 
केंद्र सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत २०१२-१३मध्ये सुरू केलेला केळीवरील करपा निर्मूलन कार्यक्रम २०१७-१८पासून बंद आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत माध्यमातून मिळणाऱ्या नुकसानभरपाईचे निकष व प्रमाणके बदलल्याने नवीन निकषावर नुकसानभरपाई मिळू शकणार नाही. या तीन वर्षाच्या कालावधीसाठी ठरवण्यात आलेल्या नवीन निकष बदलण्याची मागणी आपण राज्य सरकारकडे केली आहे. परंतु, राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे या पिक विम्याच्या समस्येवर त्वरित तोडगा काढावा, असेही त्या म्हणाल्या. 

या केल्या मागण्या 
- करपा निर्मूलन कार्यक्रमाची पुन्हा सुरुवात करण्यात यावी. 
- कुकुंबर मोझेक व्हायरसचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यावर उपाययोजना करावी. 
- पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अनुकूल निकष प्रस्थापित करावे. 

१३७ कोटी जनतेला आणले एकत्र 
इतर देशांतील गंभीर परिस्थिती पाहता भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात ‘जनता कर्फ्यु’ला सर्वांना एकत्र येऊन यशस्वी करण्याचे आव्हान लीलया पेलले. वारंवार मीडियाच्या माध्यमातून काळजी घेण्याच्या सुचनांमुळे देशातील लोकांमध्ये जागरूकता निर्माण झाली. कोविडच्या या काळात मोदींसारख्या एका नेत्याच्या आवाहनाला देशातील १३७ कोटी जनतेने प्रतिसाद दिला, त्यांना एकत्रित आणण्याची किमया मोदींच्या नेतृत्वाने केली, असे गौरवोद्गारही खडसेंनी काढले. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com