आशादायक : नवजात बाळांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई 

आशादायक : नवजात बाळांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई 

जळगाव  : कोरोना महामारीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयात कोरोनाबाधित व संशयित ३० महिलांची सुखरूप प्रसूती झाली. त्यातून गोंडस बाळांनी जन्म घेतला. त्यापैकी बहुतांश निगेटिव्ह आहेत. जे पॉझिटिव्ह आढळून आले, त्या नवजात योद्ध्यांनीही कोरोनावर मात करत त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष जिंकलाय. 

काही महिन्यांत जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढला. त्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आरोग्य सुविधांच्या मर्यादाही स्पष्ट होऊ लागल्या. सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि यंत्रणेची उदासीनता समोर आली. रुग्णालयातील कोविड कक्षाच्या शौचालयात सात दिवस बेपत्ता वृद्धेचा मृतदेह आढळल्यानंतर या यंत्रणेवर राज्यभरातून टीका झाली. 

टीम बदलानंतर सुधारणा 
समाजात या यंत्रणेबद्दल नकारात्मक चित्र तयार झाले असताना अधिष्ठातांची बदली, नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या टीमची नियुक्ती, असे बदल झाले. त्यानंतर काही सुधारणाही होऊ लागल्या. या सुधारणांचे सकारात्मक परिणाम समोर येऊ लागले. 
कोविडचा गर्भवती महिलांना जास्त धोका असल्याचा समज असताना जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग विभागाने सर्वच केसेसची हाताळणी अत्यंत उत्तम पद्धतीने करून चांगले परिणाम देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. दोन महिन्यांत रुग्णालयात नऊ कोरोनाबाधित, तर सहा संशयित महिलांचे सीझर झाले. त्यापैकी फक्त एक शिशू पॉझिटिव्ह आला. त्यावर उपचार करण्यात आले. तीन सामान्य, तर आठ संशयित महिलांची प्रसूती नॉर्मल झाली. या सर्व महिलांची बाळं निगेटिव्ह होती. बाहेरून सिव्हिलकडे रेफर झालेल्या तीन संशयित महिलांचीही यशस्वी प्रसूती करण्यात आली. 
कोरोनाबाधित व संशयित महिलांच्या प्रसूतीच्या बहुतांश केसेसमध्ये बाळ निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या दोन बाळांनी कोरोनावर मात केली. सध्या एका बाधित महिलेसह तिच्या बाळावर उपचार सुरू असून, तेही लवकरच बरे होतील. 


या टीमचे अथक परिश्रम
कोरोनाविरोधातील युद्धात वैद्यकीय स्टाफ वॉरिअर म्हणून फ्रंटफूटवर लढत असताना स्त्रीरोग व प्रसूती विभागाच्या टीमने अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने चांगले परिणाम दर्शविले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली या टीममध्ये विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे, डॉ. नरेंद्र पाटील, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, डॉ. गणेश भारुळे, नवजात शिशूतज्ज्ञ डॉ. बाळासाहेब सुरासे यांचा समावेश आहे.  


संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com