शेंडीने दाखवला चोरट्यांचा पत्ता
शहरातील वाढत्या घरफोड्या चोरीचे गुन्ह्यांचा शेाध घेतांना पिंप्राळा हुडकोत चोरीचा माल घेणाऱ्या एका संशयीतापर्यंत पोलिस पोचले. कवडीमोल भावात घेतलेल्या वस्तुंसाठी पोलिसांनी झोडपुनही त्याला चोरट्यांचे नाव सांगता येईना.
जळगाव : वाघुळदेनगरात मध्यरात्री आलेल्या नळाला पाणी भरणाऱ्या कुटूंबाच्या घरातील भिंतीवरील एलईडी, मोबाईल, बँक पासबुक दान पेटीसह साहित्य लांबवणाऱ्या टोळीचा गुन्हेशाखेने अखेर वीस दिवसानंतर छडा लावला. चोरीचा माल घेणाऱ्या पिंप्राळा हुडकेतील म्होरक्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याला चोरीचा माल कवडीमोल भावात विकणाऱ्या तिघांपैकी शेंडी सोन्याचे अचुक वर्णन केल्याने गुन्हेशाखेच्या पथकाला तपासाचा धागा सापडून तिघांना अटक केली.
असा झाला उलगडा
शहरातील वाढत्या घरफोड्या चोरीचे गुन्ह्यांचा शेाध घेतांना पिंप्राळा हुडकोत चोरीचा माल घेणाऱ्या एका संशयीतापर्यंत पोलिस पोचले. कवडीमोल भावात घेतलेल्या वस्तुंसाठी पोलिसांनी झोडपुनही त्याला चोरट्यांचे नाव सांगता येईना. जळगाव जिल्ह्यातील सर्वच रेकॉर्डवरील संशयीतांचे फोटो दाखवुन झाले. मात्र, तो ओळखू शकला नाही. नावगाव माहिती नाही..ओळखत नाही तरी चोरीचा माल घेतेा म्हणुन आणखीच प्रसाद भेटल्यावर त्याला एकाचे नाव आणि अचुक वर्णन आठवले..तो, म्हणजे शेंडी असलेला सोन्या आणि येथूनच गुन्ह्याचा उलगडा झाला.
मालासह तिघांना ताब्यात
पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या पथकातील संजय हिवरकर, राजेश मेंढे, रवि नरवाडे, दिनेश बडगुजर अशांच्या पथकाने संशयीताचा पिच्छा पुरवुन दुधफेडरेशन परिसरातूनच विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे (वय-२५), पंकज उर्फ गोलु समुद्रे (वय-२२) व मिलिंद उर्फ आप्पा भिका व्यहाळे (वय-२८) (सर्व रा.राजमालती नगर) अशांना ताब्यात घेतले. खातरपानी झाल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली देत. चोरीतील मोबाईल काढून दिला आहे.
पैसा पार्ट्यांमध्ये उडवले..
अटकेतील विठ्ठल उर्फ सोन्या अशोक लोंडे, पंकज उर्फ गोलु समुद्रे व मिलिंद उर्फ आप्पा भिका व्यहाळे हे तिघे त्याच परिसरात वास्तव्याला आहेत. प्राणघातक हल्ला, हाणामाऱ्यांसह चोरीचे इतरही गुन्हे त्यांच्यावर दाखल असून नुकतेच एका गुन्ह्यात त्यांना जामीन मिळून देान दिवसांपुर्वीच कारागृहातून बाहेर आले असून चोऱ्या करुन आलेल्या पैशांतून यथेच्छ पार्ट्या करण्यात तिघांचे परिसरात नाव असल्याची माहिती पेालिसांना मिळाली.
संपादन ः राजेश सोनवणे