
पुन्हा लॉकडाउन लागण्याची देखील शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळे तातडीने सेस फंडाच्या ५० टक्के निधीतून विकासकामांचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
जळगाव : जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी निधीची कमतरता आहे. कोरोनामुळे ही परिस्थिती ओढावली असून, यात सेस फंडाला ५० टक्के कट लागल्याने विकासकामांना ब्रेक लागला आहे. परंतु, उर्वरित पन्नास टक्के शिल्लक असलेला निधीदेखील खर्च होत नाही. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लॉकडाउन झाल्यास याला पूर्णपणे विराम लागण्याची भीती असल्याने निधी खर्च करण्यासाठी नियोजनासंदर्भात चर्चा करण्यात आली.
आवश्य वाचा- धागा धागा जोडत लावला ‘लेफ्टनंट’चा स्टार -
जिल्हा परिषदेचा ५० टक्के सेस फंडाच्या निधीच्या नियोजनासाठी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांची सोमवारी (ता. २३) बैठक झाली. यात पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना तातडीने नियोजन करण्याच्या सूचना केल्या. अध्यक्षा रंजना पाटील यांच्या दालनात बैठक झाली. या वेळी सदस्य मधुकर काटे, अमित देशमुख, पल्लवी सावकारे, विरोधी सदस्य नानाभाऊ महाजन, रावसाहेब पाटील, तसेच सीईओ डॉ. बी. एन. पाटील, अतिरिक्त सीईओ गणेश चौधरी, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
दुसरी लाट आली तर...
कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. असे झाल्यास पुन्हा लॉकडाउन लागण्याची देखील शक्यता व्यक्त होते आहे. त्यामुळे तातडीने सेस फंडाच्या ५० टक्के निधीतून विकासकामांचे नियोजन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेकडे सद्यःस्थितीला २८ कोटींचा सेस फंड आहे. त्यातील ५० टक्के अर्थात जवळपास १५ कोटींच्या कामाचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती अध्यक्षा रंजना पाटील यांनी दिली.
पदभरतीची मागणी करणार
नाशिक विभागाचे आयुक्त बुधवारी (ता. २५) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांच्याकडे जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती करण्याबाबत मागणी करणार असल्याचे अध्यक्षा रंजना पाटील यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत अनेक विभागातील प्रमुखांची पदे रिक्त आहेत. ते तातडीने भरून कामांना गती देण्याची मागणी आयुक्तांकडे करण्यात येणार आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे