संशयितांचे "स्वॅब' घेण्याचे प्रमाण वाढले... अहवालास मात्र विलंब

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

"कोरोना' संशयितांचा स्वॅब घेतल्यानंतर 24 तासांत अहवाल येणे आवश्‍यक आहे. परंतु स्वॅबची संख्या वाढल्याने प्रयोगशाळेवर याचा ताण वाढला आहे.

जळगाव :  शहरात कोविड विषाणूचा संसर्ग वाढत असून, रुग्णसंख्या सातशेपार गेली आहे. संशयितांच्या संख्येतही वाढ झाली आहे. महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये रविवारी दोनशे स्वॅब (नमुने) घेण्यात आले. मात्र, अहवाल येण्यास उशीर होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. कोरोना रोखण्यास महापालिका प्रशासनाला देखील अपयश आले आहे. 

"लॉकडाउन' शिथिल केल्यानंतर रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली असून, शहरात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहर व ग्रामीण भागात दररोज चाळीस ते साठ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. 

दोनशे स्वॅब घेतले 
महापालिका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील कोविड सेंटरवर रविवारी 200 स्वॅब घेण्यात आले. सकाळी नऊ ते सायंकाळी सातपर्यंत स्वॅब घेण्याचे 
काम वैद्यकीय यंत्रणेला करावे लागले. मागील आठवड्यात 178 जणांचे स्वॅब घेण्याची नोंद आहे. 

अहवाल उशिरा; कुटुंबीयांना ताण 
"कोरोना' संशयितांचा स्वॅब घेतल्यानंतर 24 तासांत अहवाल येणे आवश्‍यक आहे. परंतु स्वॅबची संख्या वाढल्याने प्रयोगशाळेवर याचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक संशयितांचा चार ते पाच दिवस उलटून देखील अहवाल मिळत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. अहवाल लवकर येत नसल्याने कुटुंबीयांसह नातेवाइकांचा जीव टांगणीला असतो. 

गर्दीवर नियंत्रण हाताबाहेर 
शहरात लॉकडाउन शिथिल केल्यानंतर मार्केट तसेच बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. महापालिकेकडून रस्त्यावर हॉकर्स व भाजीपाला विक्री करण्यावर बंदी केली असून, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई केली जात आहे. पण तरीही गर्दी कमी होताना दिसत नाही. 

शनिपेठ रस्त्यावर ट्रॅफिक जाम 
शिवाजीनगर, ममुराबादकडून शहरात येणाऱ्या शनिपेठच्या रस्त्यावर आज सकाळी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. सुमारे एक ते दीड तास वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्याने अनेकांना 
वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon The number of suspects testing swabs increased but reporte Delay