साडेसहा हजार शेतकऱ्यांकडून सहा कोटी वसूल 

देवीदास वाणी
Sunday, 3 January 2021

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात या योजनेंतर्गत १३ हजार १७२ शेतकरी कर भरणार आढळले.

जळगाव : इन्कम टॅक्स भरणारे असतानाही पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या जिल्ह्यातील सहा हजार ६४७ शेतकऱ्यांकडून तहसीलदारांनी पाच कोटी ९३ लाख २१ हजार ४०० रुपयांची रक्कम वसूल केली आहे. त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. वसूल रक्कम केंद्र शासनाला परत पाठवण्यात येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिली. 
केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवली होती. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात या योजनेंतर्गत १३ हजार १७२ शेतकरी कर भरणार आढळले. इन्कम टॅक्स भरणारे असूनही पीएम-किसान योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले होते. प्राप्तिकरदात्या शेतकऱ्यांची यादी केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला पाठविली. 

योजनेसाठी ठरविले अपात्र
शेतकऱ्यांनी पीएम-किसान योजनेचा १२ कोटी ४८ लाख ५२ हजार रुपयांचा लाभ घेतला आहे. या शेतकऱ्यांना पीएम-किसानचा पुढील हप्ता मिळण्यास अपात्र ठरवण्यात आले. त्यांनी आतापर्यंत घेतलेली रक्कम वसूल करण्यात येत आहे. हा प्रकार सर्वांत अगोदर अमळनेर तालुक्यात आढळला. नंतर सर्वच तालुक्यांत असे प्रकार आढळले. सर्वच तहसीलदारांनी इन्कम टॅक्स भरणाऱ्या १३ हजार १७२ शेतकऱ्यांना नोटीस दिली. आतापर्यंत सहा हजार ६४७ शेतकऱ्यांकडून पाच कोटी ९३ लाख २१ हजार ४०० रुपये वसूल करण्यात आले आहेत. 
 
वसूल करण्यात आलेली रक्कम अशी 
तालुका-- रक्कम-- शेतकरी 
अमळनेर-- ५७ लाख ७६ हजार--६२१ 
चोपडा-- ३३ लाख ६८ हजार-- ३६९ 
पाचोरा-- ४० लाख १५ हजार-५०९ 
भडगाव-- ३० लाख ३६ हजार-२८९ 
चाळीसगाव-- ४५ लाख ५२ हजार--४८४ 
जळगाव-- ६७ लाख ६६ हजार--५९९ 
जामनेर--५४ लाख ९४ हजार--५९९ 
एरंडोल-- २३ लाख १६ हजार--२४८ 
धरणगाव-- ३८ लाख ६८ हजार--४४६ 
पारोळा- ३१ लाख ६६ हजार--३५० 
भुसावळ-- २९ लाख ६४ हजार--३०३ 
बोदवड-- १५ लाख ४२ हजार--१६८ 
मुक्ताईनगर-- १७ लाख ४ हजार--१७४ 
यावल-- ३७ लाख ७८ हजार-- ५४७ 
रावेर-- ६९ लाख ५८ हजार ४००--९४१ 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon pm kisan yojna farmer use duplicate name