डंपर सोडविण्याचा पोलिसाचाच आटापिटा; पुढे झाला असा परिणाम

देविदास वाणी
Sunday, 25 October 2020

अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर यावर कारवाईसाठी ते डंपर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती डंपरच्या मालकाला कळविल्यानंतर काही वेळातच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचा कर्मचारी संदीप पाटील पांडे चौकात पोचला.

जळगाव : तलाठ्याच्या पथकाने अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करण्यासाठी ते जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. या डंपरवर कारवाई करण्यापूर्वी पोलिस कर्मचाऱ्याने हे डंपर सोडून देण्याचा प्रयत्न केला. परंतु ठाणे अंमलदाराने हा प्रयत्न हाणून पाडत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

अवैध वाळूचे डंपर सोडून देणाऱ्या जिल्हापेठमधील पोलिस कर्मचारी संदीप पाटील याला पोलिस अधीक्षकांनी निलंबित केले. तलाठी रूपेश ठाकूर, अनिरुद्ध खेतमाळीस, संदीप डोभाळ, सी. एच. किनगे व तहसीलदारांचे वाहनचालक मनोज कोळी या पथकाने १५ ऑक्टोबरला पहाटे पांडे चौकात अवैधरीत्या वाळू नेणारे डंपर (एमएच १९ सीवाय ३६०७) पकडले होते. यातून अवैध वाळूची वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर यावर कारवाईसाठी ते डंपर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात आणले. ही माहिती डंपरच्या मालकाला कळविल्यानंतर काही वेळातच जिल्हापेठ पोलिस ठाण्याचा कर्मचारी संदीप पाटील पांडे चौकात पोचला. या वेळी हे डंपर आपल्या यादीतले असल्याचे सांगून सोडून द्या, असे त्या पोलिस कर्मचाऱ्याने पथकाला सांगितले. परंतु पथकाने त्याचे काहीही एक न ऐकता डंपर जप्त करून ते त्या ठिकाणाहून निघून गेले. 

अंमलदाराने रोखून धरला होता डंपर 
जप्त केलेल्या डंपरची चावी ठाणे अंमलदाराच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली होती. संदीप पाटील पोलिस ठाण्यात येऊन त्याने ड्रॉवरमधून ती चावी काढीत डंपरचालकाला दिली. या वेळी चालक डंपर घेऊन जात असताना ठाणे अंमलदारने तो डंपर रोखून धरत चावी काढून घेतली. 

प्राथमिक चौकशीनंतर केले निलंबित 
याप्रकरणी दोन दिवसांनंतर म्हणजेच १७ ऑक्टोबरला तलाठी रूपेश ठाकूर यांच्या फिर्यादीवरून डंपरचालक मयूर पाटील (रा. साकेगाव, ता. भुसावळ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. अनेकदा महसूल, पोलिस व वाळूमाफियांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचे उघड झाले आहे. अशा प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon police are trying to solve the dumper