महापौरांचा घरचा आहेर; महापालिका कोविड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण 

महापौरांचा घरचा आहेर; महापालिका कोविड सेंटरमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण 

जळगाव : महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याचे निदर्शनास आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारी येत असून, संबंधित मक्तेदाराला नोटीस बजवावी आणि त्याचे देयक रोखावे, असे पत्र महापौर भारती सोनवणे यांनी आयुक्तांना दिले आहे. 

महापालिका कोविड केअर सेंटरच्या जेवणाबाबत रुग्णांकडून तक्रारी येत असल्याने महापौर भारती सोनवणे स्वतः त्याठिकाणी जेवण करीत होत्या. महापौर स्वतः येत असल्याने जेवणाचा दर्जा सुधारला होता. मात्र, गेल्या आठवड्यात महापौरांच्या कुटुंबातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव त्यांनी घरीच राहण्याचे ठरविले. यादरम्यान महापौर दररोज फोनवरून रुग्णांशी संवाद साधत असल्याने जेवण आणि नाश्ताबाबत रुग्णांच्या तक्रारी वाढू लागल्या. गेल्या काही दिवसांत जेवण शिळे येणे, फळे सडकी असणे, नाश्ता, चहा वेळेवर न मिळणे, जेवणाचा दर्जा निकृष्ट असणे, अशा तक्रारी रुग्णांनी केल्या होत्या. 

आयुक्तांना पत्र 
तक्रारीच्या अनुषंगाने सोमवारी (ता. १०) महापौर भारती सोनवणे यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना पत्र दिले आहे. महापालिका कोविड केअर सेंटरचा मक्ता दिलेल्या मक्तेदाराला जेवणाच्या दर्जाबाबत सक्त ताकीद द्यावी आणि त्याच्या देयकातून नियमानुसार कपात करावी, असे महापौरांनी सुचविले आहे.  

भोजनाच्या ठेक्यासाठी
जेवणा संदर्भात अनेकांनी तक्रारी केल्यानंतर, महापालिकेने सहा दिवसांपूर्वी काढलेल्या भोजनाच्या ठेक्यासाठी पाच जणांचे प्रस्ताव आले आहेत. तर दुसरीकडे कोविड सेंटरमध्ये स्वच्छता कर्मचारी पुरविण्यासाठी आलेल्या निविदा उघडून आठवडा उलटला आहे. मात्र, अद्यापही महापालिका प्रशासनाने स्वच्छतेचा ठेका देण्या संदर्भात कुठलाही निर्णय घेतलेला नाही.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com