समोस्‍याची चव बिघडली; कारण आहे बटाटा

Sakal | Monday, 14 December 2020

भाजीपाल्‍यामधील कंदमुडातील प्रकार म्‍हणजे बटाटा. जेवणात बटाट्याचा वापर तसा कमी असतो; तरी देखील मागणी कायम असते. अर्थात चटपटीत खाण्यात बटाटा चव आणत असतो. मात्र याच बटाट्यामुळे समोस्‍याची चव बिघडली आहे. गेल्‍या दीड- दोन महिन्यांपासून बटाटा तेजीत चालला असून अजूनपर्यंत दर कमी झालेले नाही. 

वावडे (ता. अमळनेर) : हिरवा भाजीपाला व फळ भाज्यांच्या तुलनेत स्वस्त असलेल्या बटाट्याचे भाव सध्या घाऊक बाजारात कडाडले असून, ६० रुपये प्रतिकिलो विकला जात आहेत. लॉकडाउनमध्ये मोठ्या प्रमाणात बटाट्याचा वापर झाल्याने आवक घटली आहे. नवा माल येण्यास उशीर असल्याने भाव वाढत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. 
नेहमीच हिरवा भाजीपाला व फळ भाज्यांच्या तुलनेत बटाट्याचे भाव कमी राहतात. साधारणतः ३० ते ३५ रुपये प्रति किलोप्रमाणे बटाट्याचे भाव राहतात. हिरवा भाजीपाला, फळ भाज्या महागल्या, की बटाट्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. पण सद्य:स्थितीत बटाट्याची बाजारपेठ बदलण्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. मार्चपासून कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन सुरू झाला. हिरवा भाजीपाला, फळभाज्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हत्या म्हणून सर्व लोक बटाट्यांचा वापर करत असत. हा वापर जास्त प्रमाणात असल्याने वर्षातील बटाट्याचे उत्पन्न जवळपास संपत आले. 

वापर कमी पण मागणी असतेच
सद्य:स्थितीत मागणीनुसार बटाट्याचा पुरवठा पुरवठादार करू शकत नाही. बटाट्याचा पुरवठा जवळपास निम्म्यावर आला. नवीन बटाटा घेण्यास काही अवधी आहे. त्यामुळे बाजारात बटाट्याचे भाव ४५ ते ६० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. हिरवा भाजीपाला, फळभाज्या स्वस्त आहेत. तुलनेत कधी नव्हे बटाटा महाग झाला आहे. जोपर्यंत नवीन बटाट्याचा माल येत नाही, तोपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता नाही. भाव जरी कमी झाले नाही तरी सामान्य ग्राहकांकडून बटाट्याची मागणी कमी होत नाही, कारण उपवासाला साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याचे वडे, बटाटा भाजी आदींसाठी बटाट्याची मागणी कायमच राहणार आहे. 

सध्या मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने आम्हाला चढ्या भावाने बटाटे खरेदी करावे लागत आहे. परिणामी, खर्च वजा जाता किलोमागे पाच रुपये नफा म्हणून बटाट्याची विक्री करावी लागते. 
- भानुदास पाटील, भाजी विक्रेता, वावडे 

Advertising
Advertising

गेल्या आठ दिवसांपासून बटाट्याचे भाव दुपटीने वाढले आहेत. पण, दररोजच्या जेवणात, हॉटेलमध्ये बटाट्याचा वापर केल्याशिवाय भागत नाही. 
- प्रताप पाटील, हॉटेल व्यवसाय, वावडे 

संपादन ः राजेश सोनवणे