esakal | ‘अंडरवर्ल्ड’मध्ये आपली खूप‘चलती’;या थापांना दोघे पडले बळी आणि मग घडविले पळनाट्य  
sakal

बोलून बातमी शोधा

‘अंडरवर्ल्ड’मध्ये आपली खूप‘चलती’;या थापांना दोघे पडले बळी आणि मग घडविले पळनाट्य  

मुंबईच्या गँगचा भाई आपल्या ओळखीचा आहे, त्याच्या एरियात असे धंदे आहेत, असे सिनॅमेटिक किस्से आणि चर्चासत्र मगरे कारागृहात असताना चालत असत.

‘अंडरवर्ल्ड’मध्ये आपली खूप‘चलती’;या थापांना दोघे पडले बळी आणि मग घडविले पळनाट्य  

sakal_logo
By
रईस शेख

जळगाव ः ‘मुंबई अल्डरवर्ल्डमध्ये आपली चलती आहे, अमुक गँगचा भाई ओळखीचा असून, आपली पूर्ण सोय मुंबईत होईल. या ठिकाणाहून निघाल्यावर मुंबईत आपले प्रस्थ निर्माण करू...’ अशा एक ना अनेक अकल्पित भूलथापा मारून जिल्‍हा कारागृहाच्या बॅरेकमधील सागर, गौरव पाटील यांना सुशील मगरेने संमोहित करून सोडले होते. सर्व पाचही संशयितांनी रडकुंडीला येत याबाबतचे अनुभव व गुन्ह्यांचा ‘प्लॅन’ आणि सर्व हकीकत पोलिसांना सांगत सुशील मगरेच ‘मास्टरमाइंड’ असल्याची कबुली दिली आहे. 

जिल्‍हा कारागृहातील बंदिवान सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील (दोन्ही रा. अमळनेर) हे दोन्ही दरोडा, दंगलीच्या गुन्ह्यात १२ डिसेंबर २०१९ ला न्यायबंदी म्हणून ठेवण्यात आले होते. त्यांच्याच बॅरेकमध्ये बडतर्फ पोलिस कर्मचारी सुशील अशोक मगरे बारा दिवसांपूर्वीच अटक होऊन तो कारागृहात आला व त्याचा जोडीदार अमित ऊर्फ नितेश सुदर्शन चौधरी ऊर्फ बिहारी गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर कारागृहात मुक्कामी आला. 

‘खिचडी’ची पूर्वकल्पना 
गुन्ह्यात अनेक महिने फरार राहिल्यानंतर सुशील मगरे याला गुजरात रेल्वेस्थानकावरून गुन्हे शाखेने अटक करीत त्याची कारागृहात रवानगी झाली होती, तेव्हापासून तो कारागृहातच होता. त्याचा साथीदार अमित ऊर्फ रितेश बिहारी जामिनावर सुटला. तेव्हाच त्याला कारागृहात शिजणाऱ्या ‘खिचडी’संदर्भात पूर्वकल्पना असल्याने त्याचीही या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 

मगरेचा प्रभावच वेगळा... 
कारागृहात आल्यापासून सुशील मगरेचा वेगळाच प्रभाव इतर कैद्यांवर होता. त्यात अमळनेरचा सागर पाटील, गौरव पाटील दोघेही त्याच्या प्रभावी बोलण्याने भारावलेले होते. गुन्हा... कायदे, जामीन, न्यायालयीन शब्दांचा व्यवस्थित शब्दकोश मगरेला पाठ असून, त्याच्या जोरावर संकटात असणारा गुन्हेगार असो, की गुन्हेगारीत नावारूपाला येणारा नवखा कैदी; सर्वच त्याचे अनुयायी होते. स्वतःच्या कथित शूरतेचे किस्से तो लीलया समोरच्यांच्या घशात उतरवीत होता. पोलिस असताना केलेल्या धडाकेबाज कारवायांचा लेखाजोखा, तत्कालीन अधिकाऱ्यांनी आपला कसा वापर करून घेतला, पोलिस दलात काय चालते, गुन्हेगाराचे आराम कक्ष म्हणजेच कारागृह... असे एक ना शंभर धडे तो संपर्कातील लोकांना देत असल्याचे त्याचे साथीदार सांगतात. 

‘अंडरवर्ल्ड’ भाईंशी ओळख 
मुंबईच्या गँगचा भाई आपल्या ओळखीचा आहे, त्याच्या एरियात असे धंदे आहेत, असे सिनॅमेटिक किस्से आणि चर्चासत्र मगरे कारागृहात असताना चालत असत. त्यात लोकल गँगमध्ये जिगर बोंडारे असो की त्याच्याशी संबंधित गुन्हेगारी साखळी; हे पूर्वीपासूनच संपर्कात असल्याने न्यायालयीन तारखांवर गाठ-भेटही होत असे. तिशीतले घरफोड्या, जबरी लूट आणि दरोडा, खुनातील गुन्हेगार सलाम ठोकतात म्हटल्यावर मुंबईचे किस्सेही खरे असावेत, असा समज झाला आणि पुढचा प्रकार घडल्याचे एका संशयिताने सांगितले.

संपादन- भूषण श्रीखंडे