खासगी ‘कोविड’ रुग्णालयाकडून रुग्णांची लूट 

देविदास वाणी
Friday, 9 October 2020

ज्यांनी जादा बिलाची आकारणी केली त्यांना नोटिसा देण्यात आल्या. त्यांना जादा बिलाची रक्कम परत करावी लागणार आहे. बॉम्बे नर्सिंग ॲक्ट, आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई होईल. मात्र जादा बिले आकारणाऱ्यांनी या कायद्यान्वये कारवाईची वेळ आणू नये. 

-डॉ. एन. सी. चव्हाण,जिल्हा शल्य चिकित्सक 

जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या बिलांच्या शासकीय दरापेक्षा अधिक बिल आकारून खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांची अक्षरशः लूट केल्याची बाब लेखापरीक्षण अहवालातून समोर आली आहे. एकूण ८३१ रुग्णांकडून शासनाच्या निर्धारित बिलापेक्षा तब्बल एक कोटी ११ लाख ६० हजार ५०० रुपयांची आर्थिक लूट झाल्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. सी. चव्हाण यांना जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या लेखापरीक्षण समितीने सादर केला आहे.

जिल्ह्यात एकूण ४० कोविड हॉस्पिटलला परवानगी दिली आहे. त्यातील नऊ कोविड हॉस्पिटलनी रुग्णांची आर्थिक कत्तलच केली आहे. अनेक रुग्णालयांनी कोविडचे उपचार करताना जादा दर आकारल्याच्या तक्रार केल्या होत्या. यामुळे परवानगी दिलेल्या रुग्णालयाने दिलेल्या बिलांचे ऑडिट करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लेखापरीक्षण समितीची स्थापना करून विविध रुग्णालयांत या समितीने लेखापरीक्षकांची नियुक्ती केली होती. या लेखापरीक्षण समितीने नुकताच गल्या महिन्यातील अहवाल जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्यचिकित्सकांना सादर केला आहे. त्यानुसार खासगी कोविड हॉस्पिटलच्या डॉक्टरांची शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा ८३१ रुग्णांकडून तब्बल एक कोटी ११ लाख ६० हजार ५०० रुपयांची जास्त रक्कम रुग्णांकडून वसूल केली आहे. 
जिल्ह्यातील आठ रुग्णालयांनी ही लूट केली आहे. या रुग्णांना सात कोटी ३३ लाख ६२ हजार १४० रुपयांचे बिल आकारले आहे. शासकीय दरानुसार ही रक्कम सहा कोटी २२ लाख एक हजार ६४० एवढी होती. तब्बल एक कोटी ११ लाख ६० हजार ५०० रुपये अधिकच घेऊन लूट केली आहे.

रुग्णालयाचे नाव--रुग्णसंख्या-- आकारलेले बिल--शासकीय दरानुसार बिल--जादाची रक्कम 
- नर्मदा फाउंडेशन (अमळनेर)--१०७--५७ लाख २० हजार ४००--५६ हजार ६४ हजार ५५०--५५ हजार ८५० 
- वरदविनायक (अमळनेर)--१८--१२ लाख १९ हजार --११ लाख ८ हजार--११ लाख १ हजार 

- गोल्ड सिटी हॉस्पिटल (जळगाव)--१४२--१ कोटी ९८ लाख २० हजार ३९०--१ कोटी ९७ लाख ३ हजार ५४०--१ लाख १६ हजार ८५० 
- चिन्मय हॉस्पिटल (जळगाव)--८२--४० लाख ६४ हजार ९००--३७ लाख ८८ हजार ९००--२ लाख ७६ हजार 
- रुबी हॉस्पिटल (जळगाव)--९७--८७ लाख ३५ हजार ५००--४६ लाख ९८ हजार ६००--४० लाख ३६ हजार ६०० 
- आरुषी हॉस्पिटल (जळगाव)--९४--१ कोटी १३ लाख ३५ हजार ४००-- ७१ लाख २६ हजार ८००--४२ लाख ८ हजार ६०० 
- नीलकमल हॉस्पिटल (जळगाव)--४४--५१ लाख ४२ हजार १००--४२ लाख ८८ हजार ८५०-- ८ लाख ५३ हजार २५० 
- ओम क्रिटी केअर (जळगाव)--५९--५५ लाख २३ हजार ८५०--४० लाख ६२ हजार--१४ लाख ६१ हजार ८५० 
- आशीर्वाद हॉस्पिटल (जामनेर)-३७-- २१ लाख ९ हजार-- २० लाख ६८ हजार ८००--४० हजार २०० 
एकूण--८३१--७ कोटी ३३ लाख ६२ हजार १४०--६ कोटी २२ लाख १ हजार ६४०--१ कोटी ११ लाख ६० हजार ५०० 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon private hospital covid center patient loot