
वाढदिवसाची जय्यत तयारी झालेली होती. काम आटोपून राकेश स्वतःच्या गाडीने मित्रांसह घराकडे परतत असताना त्याचा खून झाल्याने वाढदिवस राहून गेला आणि भावाच्या वाढदिवशीच राकेशची अंत्ययात्रा निघाल्याने मित्रपरिवारालाही अश्रू अनावर झाले..
जळगाव : माजी महापौर अशोक काशीनाथ सपकाळे यांचा लहान मुलगा राकेश (वय २८) याची मध्यरात्री हत्या झाली. शिवाजीनगर स्मशानभूमीसमोरच त्याच्यावर रात्री बाराला पाळत ठेवून ‘लाडू गँग’च्या चार-पाच मारेकऱ्यांनी राकेशवर हल्ला केला. त्यात तो जागीच मृत्युमुखी पडला. गुरुवारी (ता. ५) त्याच मार्गाने आलेल्या अंत्ययात्रेला हल्ला झाला त्याच ठिकाणी विसावा देण्यात आल्याने कुटुंबीयांनी आक्रोश केला. सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक म्हणून अशोक काशीनाथ सपकाळे सर्वश्रुत आहेत.
असा केला हल्ला
मृताचा लहान भाऊ सोनू (१९) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की हॉटेल सहारा येथे वडिलांना डबा देण्यासाठी आला होता. परत घराकडे जाताना शिवाजीनगर स्मशानभूमीजवळ विशाल संजय साळुंखे (रा. प्रजापतनगर) यांच्यासह दोघांनी दुचाकी आडवी लावून वाट अडविली. त्यांच्याशी बोलत असतानाच मागून दुचाकीवर आलेल्या गणेश दंगल सोनवणे व त्याच्या दोन साथीदारांनी जवळ येत दुचाकीला धडक देत मारहाणीस सुरवात केली. इतक्यात मागून सोनूचा मोठा भाऊ राकेश सपकाळे, सचिन लढ्ढा, मयूर अग्रवाल असे येत असल्याने त्यांनी वाहन थांबवून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला.
तलवारीने हल्ला
मात्र, गणेश सोनवणे याने चालविलेल्या तलवारीने राकेशच्या मांडीवर, गळ्याभोवती वार झाल्याने तो खाली कोसळला. तसाच सोनूने दुचाकी काढून शिवाजीनगर गाठत कुटुंबीयांना माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमी राकेशला रुग्णालयात हलविण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात पहाटे चारला सोनू सपकाळे यांच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
भावाच्या वाढदिवशी अंत्ययात्रा
अशोक सपकाळे यांचा मोठा मुलगा राजू ऊर्फ बाबूचा गुरुवारी (ता. ५) वाढदिवस असल्याने लहान भाऊ राकेश सपकाळे ठिकठिकाणी शुभेच्छाफलक आणि बॅनर लावत होता. वाढदिवसाची जय्यत तयारी झालेली होती. काम आटोपून राकेश स्वतःच्या गाडीने मित्रांसह घराकडे परतत असताना त्याचा खून झाल्याने वाढदिवस राहून गेला आणि भावाच्या वाढदिवशीच राकेशची अंत्ययात्रा निघाल्याने मित्रपरिवारालाही अश्रू अनावर झाले..
दसऱ्याच्या वादाचा परिणाम
राकेशचा लहान भाऊ नवल आणि लाडू गँगच्या पोरांशी दसऱ्याला वाद झाले होते. हे वाद तेव्हाच मिटविण्यात आले. नंतर मात्र आपसात एकमेकांना खुन्नस देण्यावरून वाद होऊन त्याचे पर्यवसान गुरुवारी मध्यरात्री हल्ल्यात झाले.
दोन अटकेत, दोघे ताब्यात
खुनाचा गुन्हा दाखल होऊन रात्रीपासूनच जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंडे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले आदींनी धाव घेतली. घटनास्थळी जखमी व हल्लेखोरांची वाहने सापडल्याने पोलिसपथकाने तत्काळ तपासचक्रे फिरवून गणेश सोनवणे व विशाल साळुंखे या दोघांना अटक केली असून, रूपेश सपकाळे व मोहन निंबाळकर या दोघांना गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले.
जिथे गेला जीव, तिथेच विसावा
शिवाजीनगर स्मशानभूमीसमोरच झालेल्या प्राणघातक हल्ल्यात राकेश सपकाळेची हत्या झाली. घटनास्थळावर दुसऱ्या दिवशीही रक्ताचे डाग तसेच होते. याच मार्गाने आलेल्या राकेशच्या अंत्ययात्रेला हल्ला झालेल्या ठिकाणीच विसावा दिला गेला. तेव्हा त्याचे भाऊ, नातेवाईक आणि कुटुंबीयांनी आक्रोश केला. अंत्ययात्रेत सहभागी राजकीय पदाधिकाऱ्यांसह गर्दीला तेव्हा घटनास्थळ हेच असल्याचे माहिती झाले.
संपादन ः राजेश सोनवणे